मुंबई : काही दिवसांपूर्वी जशास तसे उत्तर देण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीने भारतीय सैन्याच्या पलटवाराची धास्ती घेतली आहे. भारतीय हवाई दलाच्या एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे घाबरलेला अफ्रिदी शांततेची भाषा करू लागला आहे. त्याने भारताला युद्ध थांबवण्यास सांगितले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही माघार घेत चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट उसळत आहे. पाकिस्तानला जशासतसे उत्तर देऊन शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घ्या,अशी मागणी जोर धरत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतालाच धमकावण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली होती. अफ्रिदीनेही इम्रान खान यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. त्यानं ट्विटर करताना खान यांनी स्पष्ट संदेश दिला असल्याचे मत व्यक्त केले होते.
मात्र, मंगळवारी भारतीय हवाई दलाने घरात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला. बालोकेट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने 1000 किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केला. त्यात जवळपास 300 हून अधिक दहशतवादी ठार झाले. बुधवारी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय वायू सेनेने पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. पाकिस्तानच्या विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी होताच, भारतीय विमानांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामध्ये पाकिस्तानचे एक विमान नेस्तनाबूत करण्यात आले आहे. पाकिस्तानचे एफ 16 हे विमान कोसळले आहे.
मात्र, भारतीय हवाई दलाचे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले आणि त्यातील जवान पाकिस्तानच्या हद्दीत गेला. त्या भारतीय जवानाला पाकिस्तान सैन्याने अटक केली आहे आणि त्याचा एक व्हिडीओ पाकिस्तान सैन्याने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात पाकिस्तानी सैन्य शत्रूलाही कसे आदराने वागवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अफ्रिदीनेही हा व्हिडीओ पोस्ट करून भारताने युद्ध थांबवावे असे सांगितले आहे. तो म्हणाला,''शत्रूलाही आदराने वागवणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा मला अभिमान आहे. भारताने सुरू केलेले हे युद्ध थांबवावे. आमचा देश शांतताप्रिय आहे आणि चर्चेतून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.''