Shahid Afridi on IPL । नवी दिल्ली : भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजसह जगभरातील निवृत्त क्रिकेटपटूंना पुन्हा मैदानावर पाहायचे असेल, तर लीजेंड्स क्रिकेट लीग क्रिकेट पाहा असे आवाहन शाहिद आफ्रिदीने केले आहे. खरं तर सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. जगभरातील अनेक निवृत्त क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळत आहेत. लीजेंड्स क्रिकेट लीग 2023 चा चौथा सामना इंडिया महाराजा आणि आशिया लायन्स यांच्यात खेळला गेला.
दरम्यान. गौतम गंभीरच्या नेतृत्वातील आशिया लायन्सच्या संघाने शाहिद आफ्रिदीच्या संघाचा पराभव करून विजयाचे खाते उघडले आहे. या सामन्याच्या मध्यावर भारतीय समालोचकाने माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीदरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने दोन मोठी विधानं केली आहेत. शाहिद आफ्रिदी भारत-पाकिस्तानच्या जुन्या सामन्यांबद्दल बोलत होता. तो म्हणाला की, पूर्वी वातावरण खूप चांगले असायचे. भारत-पाकिस्तान सामना नेहमीच चांगला असतो, त्यामुळे भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या देशात जाऊन पुन्हा क्रिकेट खेळावे अशी माझी इच्छा आहे.
IPLबाबत आफ्रिदीचे मोठे विधान आताच्या घडीला पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग खेळवली जात आहे. तसेच भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात आशिया चषकावरून वादंग सुरू आहे. भारतीय संघ आशिया चषकाची स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव भारत पाकिस्तानात जाणार नाही. तर, भारत पाकिस्तानात न आल्यास आम्ही देखील वन डे विश्वचषकासाठी भारतात येणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. अशातच शाहिद आफ्रिदीने आयपीएलबाबत एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
लीजेंड्स लीग क्रिकेटध्ये झालेल्या मुलाखतीत आयपीएलसंदर्भात बोलताना आफ्रिदीने म्हटले, "आयपीएल ही एक चांगली आणि मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक सामना पाहण्यासाठी अनेक लोक येतात. प्रत्येक सामन्यात स्टेडियम भरलेले असते, पण एक गोष्ट मला आवडत नाही. आयपीएल ही खूप मोठी स्पर्धा आहे. त्याचा एक हंगाम खूप मोठा असतो, त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या वेळी अनेक खेळाडू जखमी होतात आणि वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला त्याचा फटका सहन करावा लागतो. पण आमच्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये असे घडत नाही."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"