मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट उसळत आहे. पाकिस्तानला जशासतसे उत्तर देऊन शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घ्या,अशी मागणी जोर धरत आहे. या हल्ल्यानंतर सोईस्कर मौन बाळगून बसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बुधवारी बोलते झाले. हल्ल्याचा साधा निषेध नोंदवण्यापेक्षा त्यांनी भारतालाच धमकावण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली.
ते म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केली पाहिजे, अशा चर्चा सुरू आहेत. चालू वर्ष हे भारतामध्ये निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला केल्यास सत्ताधाऱ्यांना राजकीय फायदा होऊ शकतो. भारताने हल्ला केला, तर पाकिस्तान शांत बसेल अशा भ्रमात राहू नका, हल्ला झाला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल. तसेच एकदा युद्ध सुरू झाले की ते थांबवणे कुणाच्याही हातात नसेल.''
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनेही इम्रान खान यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. त्यानं ट्विटर करताना खान यांनी स्पष्ट संदेश दिला असल्याचे मत व्यक्त केले.