Shahid Afridi Covid -19 Positive: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही आफ्रिदीला कोरोना झाला होता आणि त्यावर त्यानं मात केली होती. आता पाकिस्तान सुपर लीग ( PSL7) मध्ये खेळण्यासाठी सज्ज असलेल्या आफ्रिदीचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. तो घरीच क्वारंटाईन झाला आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार त्याला सात दिवस विलगिकरणात रहावे लागेल आणि कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच खेळता येईल. PSL मध्ये क्यूएत्ता ग्लॅडिएटर संघाचा सदस्य आहे.
काल शाहिद आफ्रिदीनं संघाचे बायो-बबल सोडून हॉस्पिटलला हजेरी लावली होती आणि तेथे तो काही तास होता. त्यानं तेथे चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे, संघ व्यवस्थापनानं सांगितले. आफ्रिद्रीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाही, परंतु त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुलतान सुलतान संघाकडून यंदाच्या पर्वात ग्लॅडिएटर्स संघानं आफ्रिदीला ट्रेड केलं. PSL मध्ये ५० सामन्यांत ४६५ धावा केल्या आहेत. त्यानं ४४ विकेट्सही घेतल्या आहेत.
दरम्यानं, त्यानं संघ व्यवस्थापनाकडे घरी जाण्याची मागणी एक दिवस आधी केली होती. मुलं घरी एकटीच आहेत, असं कारण त्यानं दिलं होतं. आफ्रिदीच्या पत्नीच्या नातेवाईकाचे निधन झाले आणि त्यामुळे ती तिथे गेली. त्यामुळे मुलं घरी एकटीच असल्याचे त्यानं सांगत बायो-बबलमधून बाहेर पडण्याची परवानगी मागितली होती.