पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) या ना त्या कारणामुळे चर्चेत राहतो. कधी भारतीय संघावर टीका, तर कधी काश्मिर मुद्यावर नाक खुपसण्याचं काम आफ्रिदी करताना दिसलाय. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे आणि यावेळी त्याला चूक महागात पडली आहे. लाहोर ते कराची प्रवास करताना गाडीचा वेग मर्यादापेक्षा जास्त ठेवल्यामुळे आफ्रिदीला दंड भरावा लागला आहे. राष्ट्रीय हायवे व मोटरवे पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि आफ्रिदीकडून पाकिस्तानी चलनातील १५०० रुपये दंड वसूल केला आहे.
आफ्रिदीने त्याची चूक मान्य केली. त्यानंतर त्यांनी त्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत सेल्फीही घेतला. कर्तव्य बजावताना सेलिब्रेटी व सामान्य नागरिक यांच्यात भेदभाव न करणाऱ्या पोलिसांचे त्याने कौतुक केले. पुढे त्याने ट्विट करून इतरांनाही १२०kph पेक्षा वेगाने गाडी चालवण्याची परवानगी द्यावी असा सल्ला त्याने दिला. तो म्हणाला, आपल्याकडील रस्ते चांगले आहेत आणि त्यामुळे वेग मर्यादा १२० पेक्षा अधिक ठेवायला हवी.
वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम आफ्रिदीकने १९९६ साली श्रीलंकेविरुद्ध नोंदवला होता. ३७ चेंडूंतील शतकाचा विक्रम हा १७ वर्ष त्याच्याच नाववर राहिला. आफ्रिदीने पाकिस्तानकडून २७ कसोटी, ३९८ वन डे व ९९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत .