Join us

Shaheen Afridi Wedding: शाहीन आफ्रिदी नववर्षात होणार शाहिद आफ्रिदीचा जावई; लग्नाची तारीख झाली जाहीर

Shaheen-Aqsa Afridi Wedding Date: पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:45 IST

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी नववर्षात विवाहबंधनात अडकणार आहे. अलीकडेच पाकिस्तानी संघाने मायदेशात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळली. मात्र दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदी मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता. शाहीन आता लवकरच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. तो शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा आफ्रिदीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

लग्नाची तारीख झाली जाहीर खुद्द शाहिद आफ्रिदीने एक्सप्रेस न्यूजशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. अक्सा ही आफ्रिदीची मोठी मुलगी आहे. शाहीनची होणारी बायको अक्सा अनेकदा सामना पाहताना जगासमोर आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे 3 फेब्रुवारी 2023 रोजी शाहीन आणि अक्सा यांचा विवाह होणार आहे. शाहिद आफ्रिदीने याबाबत माहिती देताना म्हटले, "माझी मुलगी अक्सा आणि 22 वर्षीय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आमच्या परंपरेनुसार लग्न करणार आहेत. हा सोहळा कराचीमध्ये होणार असून रिसेप्शनची तारीख अद्याप ठरलेली नाही. लग्नानंतर शाहीन पाकिस्तान सुपर लीगच्या आगामी हंगामात सहभागी होणार आहे. तो पीएसएलमधील लाहोर कलंदर संघाचा एक भाग आहे."

शाहीन होणार शाहिद आफ्रिदीचा जावई खरं तर शाहीन आणि अक्सा यांच्या अफेयरची चर्चा माध्यमांमध्ये आल्यानंतर शाहिद आफ्रिदीने याबाबत खुलासा केला होता. "शाहीनच्या कुटुंबीयांनी माझ्या मुलीसाठी माझ्या कुटुंबाशी संपर्क साधला होता. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आहेत. अल्लाहची इच्छा असेल तर ही जोडीही तयार होईल. शाहीनला मैदानावर आणि मैदानाबाहेर यश मिळावे यासाठी माझ्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत", असे अक्साचे वडील शाहिद आफ्रिदीने सांगितले होते. त्यानंतर लगेचच युवा शाहीनने आपल्या होणाऱ्या सासऱ्यांचे आभार मानले. त्याने लिहिले, "अलहमदुलिल्लाह. लाला तुमच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद. तुम्ही संपूर्ण देशाची शान आहात. आता अशा प्रकारे क्रिकेटशी संबंधित दोन कुटुंबे एक होतील." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानलग्नऑफ द फिल्ड
Open in App