नवी दिल्ली - पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सलामीचा फलंदाज गौतम गंभीरला डिवचले होते. गंभीरकडे व्यक्तिमत्त्व नाही. तो खूप अहंकारी आहे, अशी टीका आफ्रिदीने ‘गेम चेंजर’या आत्मचरित्रात केली आहे. त्याच्या टीकेला गंभीरने सडेतोड उत्तर दिले.
‘आफ्रिदी, तुझी टीका ही फार हास्यास्पद आहे. आम्ही (भारत) अजूनही पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा व्हिसा मंजूर करणे बंद केलेले नाही. (तू भारतात उपचारासाठी ये) मी स्वत: तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन,’ असे टिष्ट्वट केले. गंभीरशी आफ्रिदीचा एका सामन्यादरम्यान वाद झाला होता. या प्रकाराबाबत आत्मचरित्रात आफ्रिदीने खुलासा केला. तो म्हणतो, ‘काही जणांशी खासगी शत्रूत्व असते, तर काही जणांशी कामासंदर्भात. मात्र, गंभीरबद्दल माझे वैर वेगळे आहे. गंभीर विचित्र आहे.’
गंभीर एक खेळाडू म्हणून सतत नकारात्मकता जोपासत मैदानात वावरायचा. गंभीर हा डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉण्ड या दोघांचे मिश्रण आहे. अशा लोकांना आम्ही कराचीमध्ये सरियल (सनकी) म्हणतो. मला आनंदी आणि सकारात्मक लोक आवडतात. तुम्ही रागीट आणि स्पर्धात्मक वर्तणूक करीत असाल तरी हरकत नाही; मात्र तुम्ही सकारात्मक असावे. गंभीर तसा मुळीच नव्हता,’.
- शाहिद आफ्रिदी,
पाकिस्तानी क्रिकेटर
गंभीर-आफ्रिदी वाद
२००७ साली गंभीर आणि आफ्रिदीमध्ये कानपूर येथील भारत-पाकिस्तान वन डेदरम्यान वाद झाला. खेळाच्या नियमांचा भंग करून मैदानात वाद घातल्याबद्दल आयसीसीने दोघांनाही दंड ठोठावला. या घटनेबद्दल बोलताना, ‘२००७ साली आशिया कप स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान धाव घेताना गंभीर थेट माझ्या अंगावर आला होता. पंचांना मध्यस्थी करावी लागली. आम्ही एकमेकांसाठी अपशब्द वापरले,’ असे आफ्रिदी म्हणाला होता.
Web Title: Shahid, check your head - Gautam Gambhir's answer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.