Shai Hope MS Dhoni, WI vs ENG : वेस्ट इंडिजने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 213 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत शाई होपने 109 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या दर्जेदार गोलंदाजीपुढे तो पाय रोवून उभा राहिला आणि त्याने संघाला मोठे यश मिळवून दिले. या दमदार खेळीचे श्रेय शाई होपने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी झालेल्या संभाषणाला दिले. होपच्या त्या खेळीचा धोनीशी संबंध काय, जाणून घेऊया.
वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने खुलासा केला की, महेंद्रसिंग धोनीने शेवटपर्यंत कधीही हार न मानण्याचा सल्ला त्याला एकदा संभाषणात दिला होता. त्या सल्ल्याने त्याला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात प्रेरणा मिळाली. धोनीच्या संभाषणातील त्या मुद्द्यावरून त्याच्या संघाला रोमांचक विजयाची नोंद करण्यास मदत झाल्याचे होपने सांगितले. शाई होप म्हणाला, "माझे एका प्रसिद्ध व्यक्ती महेंद्रसिंग धोनीशी बोलणे झाले आणि त्याने सांगितले की, तुमचे विचार पटकन संपतात पण तुमच्याकडे वेळ जास्त असतो. मी इतक्या वर्षापासून एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे मला नेहमी त्याची ही विधाने आठवत असतात आणि प्रेरित करत असतात."
भारताचा माजी कर्णधार धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी आणि त्याच्या मॅच-विनिंग टॅलेंटसाठी ओळखला जातो. धोनीसोबतचे संभाषण शाई होपला वेळीच आठवले आणि त्याने वेस्ट इंडिजच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी दमदार कामगिरी करून दाखवली. त्याच्या खेळीच्या जोरावर विंडिजने इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात शाई होपने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करणारा शाई होप संयुक्तपणे जगातील तिसरा फलंदाज ठरला. व्हिव्ह रिचर्ड्स आणि विराट कोहलीनेही 114-114 एकदिवसीय डावात 5000 वनडे धावांचा आकडा गाठला होता.
Web Title: Shai Hope plays match winning innings against England in ODI Reminds of MS Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.