मुंबई : बांगलादेशचा भारत दौरा हा सुरु होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुरुवातीला बांगलादेशच्या संपूर्ण संघाने बंड पुकारले होते आणि पगारवाढीसाठी त्यांनी भारताच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तर बांगलादेशचा सर्वात अनुभवी क्रिकेटपटू शकिब अल हसनला बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता तो भारताच्या दौऱ्यावर जाणार की नाही, याबाबत संदिग्धती निर्माण झाली आहे.
शकिबने बांगलादेशमधील प्रमुख टेलीकॉम कंपनी ‘ग्रामीणफोन’बरोबर एक करार केला आहे. शकिबला या कंपनीने आपला ब्रँड अॅम्बेसिडर बनवला आहे. पण बांगलादेशच्या संघाची प्रायोजक ‘रोबी’ ही कंपनीदेखील टेलीकॉम क्षेत्रात आहे आणि ती कंपनी ‘ग्रामीणफोन’ या कंपनीची प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी शकिबविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. शकिबला आता क्रिकेट मंडळाकडून एक नोटीस पाठवली जाईल आणि त्याला पहिल्या सामन्यापूर्वी या नोटीशीला उत्तर द्यावे लागेल. जर शकिबने उत्तर दिले नाही तर त्याला खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे.
गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये लिहीला जाणार इतिहासमुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. पण आता अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात एक अभूतपूर्व गोष्ट पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे.
गांगुलीला अध्यक्षपदी विराजमान होऊन फक्त काही दिवस झाले आहेत. पण एवढ्या कमी दिवसांमध्ये गांगुलीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारताच्या कसोटी क्रिकेच्या इतिहासामध्ये ही गोष्ट पहिल्यांदाच होणार आहे. आता ही गोष्ट कोणती, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल.
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेतील एक सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. याबाबत बीसीसीआयने बांगलादेश क्रिकेट मंडळाला विनंती केली आहे. ही ऐतिहासिक गोष्ट गांगुलीच्य घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डन्सवर होणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कोलकाता येथील कसोटी सामना दिवस-रात्र खेळवण्यात यावा, यासाठी बीसीसीआयने बांगलादेशला प्रस्ताव पाठवला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे हा सामना दिवस-रात्र खेळवण्याचा प्रस्ताव बांगलादेशला पाठवण्यात आला आहे. या दिवस-रात्र कसोटी सामन्यामध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे.