Shakib Al Hasan to Virender Sehwag, T20 World Cup 2024 BAN vs NED: टी२० विश्वचषकात D ग्रुपमधील सामन्यात काल बांगलादेशने नेदरलँड्सचा २५ धावांची पराभव केला. या विजयासह बांगलादेशचा संघ ३ पैकी २ सामने जिंकून ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यांचे सुपर-8 मधील स्थान जवळपास निश्चित आहे. नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यात अनुभवी शाकिब अल हसनने अर्धशतक ठोकले आणि संघाला १५९ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ १३४ धावांपर्यंतच पोहोचू शकला. या सामन्याआधी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने शाकिब अल हसनच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर आता शाकिबने देखील उत्तर दिले आहे.
सेहवाग काय म्हणाला होता?
शाकिब अल हसनची या स्पर्धेतील सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरूद्ध ३ तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ८ धावा काढून शाकिब माघारी परतला. या दोनही सामन्यात त्या गोलंदाजीत एकही विकेट घेता आली नाही. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शाकिबने अतिशय बेजबाबदार फटका मारला होता. त्यानंतर वीरेंद्र सेहवागने त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला होता. शाकिब हा संघातील अतिशय अनुभवी खेळाडू आहे, त्याने या संघाचे कर्णधारपददेखील भूषवले आहेस. पण त्याचे आताचे फलंदाजीचे आकडे खूप वाईट आहेत. असा खेळ करताना त्याला स्वत:ची लाज वाटायला हवी आणि त्याने स्वत:हून टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करायला हवी, असे सेहवाग म्हणाला होता.
शाकिबचे स्पष्ट उत्तर
त्याबाबत पत्रकारांनी त्याला विचारले असता शाकिबने अतिशय माफत शब्दांत उत्तर दिले. तो म्हणाला की, कोणताही खेळाडू एखाद्याच्या टीकेला उत्तर द्यायला जात नाही. आपल्या संघासाठी चांगली खेळी करणे हे एका फलंदाजाचे काम असते. तर आपल्या संघासाठी विकेट्स काढून देणे ही गोलंदाजांची जबाबदारी असते. याशिवाय तुम्ही जर फिल्डिंग करत असाल तर प्रत्येक धाव अडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि शक्य तितके झेल घेतले पाहिजेत. त्यामुळे अशा लोकांना मला काहीही उत्तर द्यायची गरज वाटत नाही.