बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला ( Shakib Al Hasan ) ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये अखेर फॉर्म गवसला. त्याने नेदरलँड्सविरुद्धच्या निर्णायक सामन्यात अर्धशतकीय खेळी केली. त्याने ४६ चेंडूंत ९ चौकारांसह ६४ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यापूर्वी शाकिबवर सडकून टीका झाली. भारताचा महान फलंदाज वीरेंद्र सेहवाग यानेही शाकिबने आता निवृत्ती घ्यायला हवी, असा अप्रत्यक्ष सल्ला दिला.
सेहवाग म्हणाला होता की, शाकिबने ट्वेंटी-२० फॉरमॅटमधून फार पूर्वीच निवृत्ती घ्यायला हवी होती. त्याची हा फॉरमॅटमधील अलिकडील कामगिरी लज्जास्पद आहे. गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान, मला वाटले की शाकिबला यापुढे ट्वेंटी-२० संघात निवडले जाऊ नये. तू इतका वरिष्ठ खेळाडू आहेस, तू या संघाचा कर्णधार होतास, खरं तर तुला लाज वाटली पाहिजे,” असे सेहवाग क्रिकबझवर म्हणाला.
"तुला तुझ्या अनुभवामुळे वर्ल्ड कप संघात निवडले असेल, तर तो निर्णय फायदेशीर आहे, हे तू दाखवून द्यायला हवे. तुला किमान क्रीझवर थोडा वेळ घालवणे आवश्यक आहे. तू ॲडम गिलख्रिस्ट किंवा मॅथ्यू हेडन नाही, जो हुक आणि पुल फटके तू मारतोस. तू बांगलादेशी खेळाडू आहेस आणि तुझ्या ताकदीनुसार खेळ,''असेही सेहवाग म्हणाला होता.
सेहवागच्या टीकेला उत्तर देताना शाकिबचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यात तो कोण?असा प्रश्न विचारताना दिसला. या क्लिपवरून शाकिबने सेहवागला ओळखण्यास नकार दिला किंवा कोण सेहवाग? असा अर्थ लावला गेला. पण, या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे आणि त्यात त्याने भारतीय खेळाडूचा अपमान केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.