भारत विरुद्ध बांगलादेश ट्वेंटी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच पाहुण्यांना मोठा धक्का बसला. त्यांचा प्रमुख खेळाडू अन् आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या शकिब अल हसनला दोन वर्ष क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. बांगलादेश क्रिकेटसाठी हा सर्वात मोठा धक्काच म्हणावा लागेल. मॅच फिक्सिंगसाठी बुकीनं संपर्क साधल्याची माहिती शकिबनं आयसीसीच्या लाचलुचपत विभागाकडून लपवली आणि त्यामुळेच त्याच्यावर बंदीची कारवाई झाली. या कारवाईनंतर शकिबनं टोकाचं पाऊल उचलताना मोठा निर्णय घेतला आहे.
निलंबनाच्या कारवाईनंतर शकिब म्हणाला,''ज्या खेळावर मी मनापासून प्रेम केलं, त्यापासून दोन वर्ष दूर रहावे लागणार असल्यानं खुप निराश आहे, परंतु मी माझी चूक मान्य करतो.'' शाकिबला मॅच फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. ही माहिती शाकिबनं आयसीसीपासून लपवली, त्यामुळं त्याच्यावर ही बंदीची कारवाई झाली. शकिबनं हे आरोप मान्य केले. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा काळ 2018 पासून सुरू होणार असल्यानं तो 29 ऑक्टोबर 2020मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो.
या कारवाईमुळे शकिबला पुढील वर्षी इंडियन प्रीमिअर लीग आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे निराश झालेल्या शकिबनं मोठा निर्णय घेतला आहे. त्यानं मेरिलेबोन क्रिकेट क्लबच्या (MCC) क्रिकेट समितीवरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. MCC ही आजी-माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व पंचांची स्वतंत्र संघटना आहे. क्रिकेटच्या विकासासाठी काही महत्त्वाचे निर्णय ही संघटना घेते. जागतिक क्रिकेट समितीचे चेअरमन माइक गॅटींग यांनी सांगितले की,''आमच्या कमिटीमधून शकिब नसणे, हा मोठा धक्का आहे. त्यानं मागील काही वर्षांत संघटनेत भरीव योगदान दिले आहे.''
Web Title: Shakib Al Hasan steps down from MCC Cricket Committee following a two-year ban by the ICC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.