आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये काल झालेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर ३ विकेट्स राखून विजय मिळवला आणि स्पर्धेत आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद केली. मात्र या सामन्यातील बांगलादेशच्या संघाची दमदार कामगिरी ही कर्णधार शाकिब अल हसनने अँजेलो मॅथ्यूजविरोधात केलेल्या टाइम आउटच्या अपिलमुळे झालेल्या वादामुळे झाकोळली गेली. त्यातच या कृतीवरून चौफेर टीका होत असतानाही शाकिब अल हसनने केलेल्या कृतीचं समर्थन केलं आहे. क्रिकेटचा सामना हा एकप्रकारे युद्धासारखा असतो. त्यामध्ये मला माझ्या संघाच्या विजयासाठी जे योग्य वाटलं, ते मी केलं, असे शाकिबने म्हटले आहे.
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना डावातील २५ व्या षटकात अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी आला. तो फलंदाजीला सुरुवात करत असतानाच त्याच्या हेल्मेटमध्ये काहीतरी दोष असल्याचे दिसून आले. त्यामुळे मॅथ्यूजने दुसरे हेल्मेट मागवले. मात्र या दरम्यान काही वेळ गेल्याने बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने टाइम आऊटबाबत पंचांकडे अपील केले. तसेच नियमांनुसार पंचांनाही अँजेलो मॅथ्यूजला बाद द्यावे लागले. त्यानंतर मॅथ्यूजने शाकिब अल हसनकडे विनवणी केली. मात्र शाकिबने अपील मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे मॅथ्यूजला माघारी परतावे लागले.
दरम्यान, सामन्यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना शाकिब अल हसन म्हणाला की, मॅथ्यूजने फलंदाजी सुरू करण्यास बराचवेळ लावल्यानंतर एक क्षेत्ररक्षक माझ्याकडे आला. तसेच नियमानुसार अपील केल्यास मॅथ्यूज बाद होऊ शकतो. आपण अपील केलं पाहिजे असे सांगितले. त्यानंतर मलाही ते योग्य वाटले. त्यानुसार मी पंचांकडे जाऊन टाइम आऊटबाबत अपील केले. तेव्हा पंचांनी मला अपीलबाबत पुन्हा विचारणा केली, तेव्हा मी आम्हाला अपील करायचे आहे हे सांगितले. त्यानंतर त्यांनी मॅथ्यूजला बाद दिले. क्रिकेटचा सामना हा एकप्रकारे युद्धासारखा असतो. त्यामध्ये मला माझ्या संघाच्या विजयासाठी जे योग्य वाटलं, ते मी केलं, असं सांगत शाकिबने आपल्या कृत्याचं समर्थन केलं.