Angelo Mathews vs Shakib Al Hasan Timed Out Controversy : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला टाईमआउट केले होते. मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइमआउट होणारा पहिला खेळाडू ठरला. या घटनेनंतर शाकिब अल हसन चर्चेत आला. काही क्रिकेट चाहते शाकिबचे समर्थन करताना दिसले तर काहींच्या मते नियमांपेक्षाही खेळभावनेचा आदर करण्याला प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले. याचदरम्यान, शाकिबच्या कृतीवर अँजेलो मॅथ्यूजच्या भावाने अतिशय आक्रमक मत व्यक्त केले.
शाकिबने मॅथ्यूजसोबत जे केले त्यावरून श्रीलंकेचे क्रिकेट चाहते प्रचंड संतप्त झाले आहेत. शाकिबचा खेळाडू म्हणून त्यांच्या मनात असलेला आदर आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे असे दिसते. त्यामुळे आता शाकिबवर टीकेचा भडीमार केला जात आहे. तशातच मॅथ्यूजच्या भावाने त्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. "शाकिब अल हसनचे आता श्रीलंकेत कोणीही स्वागत करणार नाही. तो आमच्या देशात आला तर त्याचं काही खरं नाही. तो येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा लंका प्रीमियर लीग खेळण्यासाठी आला तर लोकं त्याला दगड मारून इथून पळवून लावतील," अशा शब्दांत मॅथ्यूजच्या भावाने यावर रोष व्यक्त केला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
वर्ल्ड कपमध्ये सोमवारच्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश आमने सामने होते. समरविक्रमा बाद झाल्यानंतर मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात आला. तो क्रीझवर पोहोचला पण त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटल्याचे त्याच्या लक्षात आले. सुरक्षेचे कारणास्तव तो आत गेला आणि दुसरे हेल्मेट घेऊन बाहेर आला. या दरम्यान बराच वेळ गेल्याने, शाकिब अल हसनने 'टाइम आऊट'चे अपील केले आणि त्यानुसार मॅथ्यूजला बाद ठरवण्यात आले.
ICC ने देखील याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, पहिला फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाने मैदानात येऊन दोन मिनिटांच्या कालावधीत पहिला चेंडू खेळावा असा नियम आहे. त्यामुळे मॅथ्यूजला बाद ठरवणे नियमानुसार योग्यच आहे. पण श्रीलंकेच्या चाहत्यांना शाकिबचे हे वागणे खेळभावनेच्या विरोधात जाणारे वाटल्याने त्याच्या टीकेची झोड उठली आहे.
Web Title: Shakib Al Hasan will face extreme Anger stone pelting in Sri Lanka says Angelo Mathews Brother over Timed Out Controversy BAN vs SL World Cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.