ढाका : ‘आयपीएलच्या आगामी उर्वरित सामन्यांत खेळल्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी तयारीची संधी मिळेल आणि यामुळे बांग्लादेश संघाला मदत मिळवून देता येईल’, असे मत बांग्लादेशचा अव्वल क्रिकेटपटू शाकिब अल हसन याने व्यक्त केले आहे. शाकिब आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत असून, बांग्लादेशचा अन्य क्रिकेटपटू मुस्तफिझूर रहीम हा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे.
शाकिब म्हणाला की, ‘आयपीएलचा सर्वच खेळाडूंना फायदा होईल, याची खात्री आहे. या लीगमुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वातावरणात आणि परिस्थितीमध्ये खेळण्याची संधी मिळेल. हाच अनुभव आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून, याचा फायदा मी आणि मुस्तफिझूर बांग्लादेशच्या इतर खेळाडूंना करून देऊ. आम्ही इतर खेळाडूंच्या मानसिकतेला समजून घेऊ.’
युएईतील परिस्थितीशी ताळमेळ साधण्यात संघाला फार वेळ लागणार नसल्याचे सांगताना शाकिब म्हणाला की, ‘आमचा संघ विश्वचषक स्पर्धेआधी किमान १५-१६ दिवस ओमानला पोहोचेल. त्यामुळे परिस्थिती आणि खेळपट्टीशी ताळमेळ साधण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ असेल. आम्हाला विजय मिळवण्याच्या मानसिकतेनेच खेळावे लागेल.’