Join us  

बांगलादेशच्या शाकिब अल हसनची नवी 'इनिंग'! राजकारणात एन्ट्री; लोकसभा निवडणूक लढणार

Shakib Al Hasan will take part in Bangladesh's parliamentary elections : शाकिब अल हसन लोकसभेची निवडणूक लढणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 2:11 PM

Open in App

नवी दिल्ली : बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन नव्या खेळीची सुरूवात करत असून त्यानं राजकारणात पाऊल ठेवलं आहे. आयसीसी वन डे विश्वचषक २०२३ मध्ये वादग्रस्त अपीलमुळे चर्चेत राहिलेला शाकिब आता लोकसभेची निवडणूक लढणार आहे. तो त्याच्या जिल्ह्यातील मागुरा -१ या मतदारसंघातून नशीब आजमावत आहे. ७ जानेवारीपासून होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी बांगलादेश अवामी लीगकडून शाकिब निवडणूकीच्या मैदानात असणार आहे. शाकिबच्या आधी मशरफे मुर्तजा याने निवडणूक लढली आहे. खरं तर त्याने खासदार असताना देखील क्रिकेट खेळले आहे. निवडणूक लढण्यापूर्वी शाकिब बांगलादेशच्या संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे कळते. 

काही दिवसांपूर्वीच दिले होते संकेत शाकिब अल हसन नवीन खेळी करणार असल्याची माहिती त्याने काही दिवसांपूर्वीच दिली होती. शाकिब त्याच्या जिल्ह्यातील दक्षिण-पश्चिम गृह जिल्हा मागुरा किंवा राजधानी ढाका येथील जागेवरून निवडणूक लढवू शकतो, असे बांगलादेश अवामी लीगचे संयुक्त सरचिटणीस नसीम यांनी सांगितले होते. सध्या बांगलादेशचे पंतप्रधानपद शेख हसीना यांच्या हाती आहे. खरं तर यावेळीही विरोधी पक्षांचा बहिष्कार कायम राहिल्यास चौथ्यांदा त्या सत्तेत परतणार हे जवळपास निश्चित आहे. हसीना यांनी देशाची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले, परंतु पाश्चात्य देशांनी लोकशाही व्यवस्थेच्या घसरणीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांनीही त्यांच्यावर गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतदानात हेराफेरी केल्याचा आरोप केला. 

दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हाताच्या बोटाच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. अलीकडेच वन डे विश्वचषकातील एका सामन्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात शाकिबने मॅथ्यूजला 'टाइम आऊट' बाद घोषित करण्याची मागणी करताच तो चाहत्यांच्या निशाण्यावर आला. दुखापतीमुळे तो न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे.  

टॅग्स :बांगलादेशराजकारण