जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 46 लाख 46,707 इतकी झाली आहे. त्यापैकी 87 लाख 37,835 रुग्ण बरे झाले असले तरी 6 लाख 08,978 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. क्रीडापटूंनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. फुटबॉलपटूंमध्ये हे प्रमाण अधिक आहे. क्रिकेटलाही याची झळ सोसावी लागली आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना कोरोना झाला आहे आणि आईच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
धक्कादायक; सहाव्या माळ्यावरून खाली पडून 20 वर्षीय ऑलिम्पिकपटूचा मृत्यू
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनचे वडील मश्रुफ रेझा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रविवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट समोर आला. त्याच्या आईची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. शकिब सध्या लंडनमध्ये आहे आणि फाऊंडेशनच्या माध्यमातून तो बांगलादेशमध्ये कोरोनाबाधीत लोकांना मदत करत आहे.
बांगलादेशमध्ये 2 लाख 4525 रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 2618 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. 1 लाख 11,642 रुग्ण बरे झाले आहेत. शकिबच्या वडिलांना मागील काही दिवसांपासून सर्दी ताप झाला होता. ''ते बँकेत काम करतात.. त्यांच्याआधी 6-7 लोकांना कोरोना झाला होता. त्यानंतर वडिलांची चाचणी करण्यात आली आणि आता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे,''असे शकिबची चुलत बहिण सोहननं सांगितले. तिनं पुढे सांगितले की,''शकिबच्या आईचीही टेस्ट करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट उद्या मिळणार आहे.''
मागील महिन्यात बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफे मोर्ताझा याला कोरोना झाला होता. त्यानं त्यावर मात केली. बांगलादेशचा माजी कर्णधार तमिम इक्बालचा भाऊ नफीस इक्बाल यालाही कोरोना झाला आहे.