Pakistani Cricketer slams pakistan over Pahalgam Terrorist Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात उमटत आहेत. काश्मीर खोऱ्यातील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारले. या भ्याड हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. हा हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोन जण पाकिस्तानी असल्याचे समजले. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी प्रत्येकी भारतीयाकडून केली जात आहे. याचदरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने पाकिस्तानची लक्तरं काढली आहेत. त्याने ट्विट करत, पाकिस्तान सरकार आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना झोडपून काढले आहे.
हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध नसेल तर मग...
"पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जर पाकिस्तानचा खरंच काहीही संबंध नसेल तर पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आतापर्यंत या हल्ल्याचा निषेध का केलेला नाही? पाकिस्तानातील सुरक्षादलांना अचानक हाय अलर्ट का देण्यात आला आहे? कारण कितीही नाकारलं तरी तुम्हालाही सत्य माहिती आहे की, तुम्हीच दहशतवाद्यांना आश्रय देताय आणि पोसताय. तुमची लाज वाटते," असे ट्विट करत दानिश कनेरियाने संताप व्यक्त केला.
"नेहमी असंच का घडतं की, स्थानिक काश्मीरी लोकांना लक्ष्य केलं जात नाही, सातत्याने काश्मीरी पंडितांवर किंवा भारतभरातील हिंदू पर्यटकांवरच का हल्ले केले जातात? कारण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही दहशतवाद हा एकाच विचारसरणीचे पालन करतोय आणि संपूर्ण जग त्याची किंमत मोजतोय," असं रोखठोक मत कनेरियाने मांडलं.
निष्पाप भारतीयांना ठार मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ!
दरम्यान, भारतीय माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामीनेही संतप्त भावना व्यक्त केल्या. "राजकारणापेक्षा खेळ मोठा असतो अशा बाता काही लोक मारत होते. अजूनही तुम्हाला असंच वाटतं का? कारण मला जे दिसतंय त्यावरून असंच कळतं की निष्पाप भारतीयांना ठार मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे. जर त्यांना हा खेळ खेळत राहायचा असेल तर आता ती वेळ आलीय की, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. केवळ क्रिकेटच्या माध्यमातून नाही तर कुठलीही दयामाया न दाखवता प्रत्युत्तर द्यावं लागेल," अशी भावना त्याने व्यक्त केली.
Web Title: Shame on you Pakistan Cricketer Danish kaneria slams PM Shahbaz Sharif and says you know the truth
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.