''यापुढे रोहित शर्मा हा वन डे संघाचा कर्णधार असेल,'' बीसीसीआयच्या या ट्विटनं सर्वांना मोठा धक्का बसला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी विराट कोहलीनं ( Virat Kohli) ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून ही शेवटची स्पर्धा असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर विराटकडून वन डे संघाचे कर्णधारपदही जाणार असे संकेत मिळाले होतेच. बीसीसीआयनं कधीच विभाजीत (Spit Captancy) कर्णधारपद यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटसाठी आतापर्यंत एकच किंवा मर्यादित षटकांसाठी एक व कसोटीसाठी वेगळा कर्णधार अशी प्रथा सुरू ठेवली होती. त्यामुळे ट्वेंटी-२० व वन डे संघासाठी वेगवेगळे कर्णधार बीसीआयला मान्य होणारे नाही. त्यामुळे हा निर्णय त्यांच्या दृष्टीनं योग्य आहे, परंतु विराटचे चाहते खवळले आहेत.
विराट वन डे संघाचे कर्णधारपद सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहेत. विराटला २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्व करायचे होते, पण बीसीसीआयनं त्याच्याकडून हे पद काढून घेतले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 95 वन डे सामन्यांत 65 विजय मिळवले आहेत, तर 27 पराभव पत्करले आहेत. त्यानं कर्णधार म्हणून 72.65च्या सरासरीनं 5449 धावाही केल्या आहेत. विराटला अशा पद्धतीनं कर्णधारपदावरून काढल्यामुळे चाहते संतापले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर #ShameonBCCI हा ट्रेंड सुरू केला आहे.