नवी दिल्ली : ज्या मोबाईलमध्ये हसीन जहाँला शामी आणि अलिश्बा यांच्यातील संभाषण सापडले होते, तो इंग्लंडमधल्या मोहम्मद भाई यांचा होता. पण हे मोहम्मद भाई नेमके कोण? या गोष्टीचा खुलासा मात्र होत नव्हता. पण आता दस्तुरखुद्द मोहम्मद भाई प्रसारमाध्यांपुढे आले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ' शामी कधीही देशाला फसवणार नाही', असे म्हटले आहे.
मोहम्मद शामी हा पाकिस्तानच्या अलिश्बाला दुबईमध्ये भेटला होता. त्यावेळी शामीने तिच्याकडून पैसे घेतले होते, तो देशाची फसवणूक करत आहे, असे आरोप हसीन जहाँने शामीवर केले होते. हसीनला ज्या मोबाईलमध्ये शामी आणि अलिश्बा यांच्यातील संभाषण सापडले होते. पण तो मोबाईल इंग्लंडमधील मोहम्मद भाईचा होता, असे शामीने म्हटले होते. यावेळी मोहम्मद भाई यांनी देखील शामीवर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे.
मोहम्मद भाई म्हणाले की, " शामीचा मी एक चाहता आहे. इंग्लंड येथील एका सामन्याच्यावेळी मी त्याला भेटलो होतो. आमची चांगली ओळखही झाली होती. त्यानंतर शामी आणि त्याची पत्नी हसीन यांना इंग्लंडमध्ये मी काही ठिकाणी पर्यटन फिरवलेही आहे. मी त्या दोघांनाही चांगलेच ओळखतो. "
हसीनने शामीवर केलेल्या आरोपांवर मोहम्मद भाई म्हणाले की, " शामी कधीही देशाची फसवणूक करू शकत नाही. तो नेहमीच देशाचा सन्मान करतो. त्यामुळे त्याच्यावर जे आरोप हसीनने केले आहेत ते बिनबुडाचे आहेत. "