नवी दिल्ली : आयुष्यात एकदा वाईट गोष्टी घडायला सुरुवात झाली तर त्यांची रांग काही थांबता थांत नाही, असं म्हणतात. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या बाबतीतही असेच काहीसे पाहायला मिळाले. अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप शामीवर त्याच्या पत्नीने सकाळी केला आणि त्याच्या आयुष्यात मोठं वादळ आलं, पण हे वादळं शमलं नसतानाही दुसऱ्या एका वादळाचा तडाखा त्याला बसला आहे.
शामीवर सकाळी पत्नीने गंभीर आरोप केले. दिवसभर या गोष्टीची चर्चा चांगली रंगत होती. संध्याकाळी बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली आणि यामध्ये शामीला मोठा धक्का बसला. एकेकाळी भारताचा भरवश्याचा गोलंदाज असलेल्या शामीला या करारामध्ये बीसीसीआयने स्थान दिले नसल्याची बाब समोर आली आहे. बीसीसीआयने नवीन करारबद्ध 26 खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली. या यादीमध्ये शामीच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.
"शामीच्या वैयक्तीक आयुष्याशी बीसीसीआयचा काहीही संबंध नाही किंवा शामी हा चांगला खेळाडू नाही, असेही बीसीसीआयचे म्हणणे नाही. पण शामीची कोलकाताच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे वृत्त आम्हाला समजले आहे, त्यामुळे चौकशीनंतरच याप्रकरणी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, '' असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
" मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ किंवा तिच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीकडून आम्हाला अधिकृत तक्रर मिळालेली नाही, " अशी माहिती पोलीस उप आयुक्त (जाधवपूर) संतोष निंबाळकर यांनी दिली आहे.