मुंबई : भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पहिल्या कसोटी मालिका विजयाच्या प्रयत्नात असताना शनिवारी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दोन सामन्यांच्या मालिकेत खेळणार नसल्याचे वृत्त धडकले. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने शमीला खेळण्याची परवानगी नाकारली. विश्वचषकात शानदार कामगिरी केल्यानंतर घोट्याच्या दुखापतीचा सामना करणाऱ्या शमीचा कसोटी संघात समावेश करण्यात आला होता; पण फिट असेल तरच कसोटी खेळेल, हेदेखील स्पष्ट करण्यात आले होते. बोर्डाने शमीचे स्थान कोण घेणार हेदेखील स्पष्ट केलेले नाही.
भारत - द. आफ्रिका यांच्यात पहिली कसोटी २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे होईल. त्याआधी भारतीय खेळाडू २० डिसेंबरपासून आपसांत सराव सामना खेळतील. शमी सध्या स्वत:च्या घरी दुखण्यावर उपचार घेत आहे. तो इंग्लंडविरुद्ध २५ जानेवारीपासून हैदराबाद येथे सुरू होणाऱ्या स्थानिक कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकतो.
दीपक चाहरचीही माघारवेगवान गोलंदाज दीपक चाहर याने वनडे मालिकेतून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्याची जागा वेगवान गोलंदाज आकाशदीप घेईल. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दीपक चाहरच्या वडिलांची तब्बेत बरी नाही. त्यामुळे तो वडिलांच्या सेवेत आहे.
रविवारी होणाऱ्या पहिल्या वन डेनंतर श्रेयस अय्यर हादेखील कसोटीच्या तयारीसाठी संघात दाखल होईल. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सहयोगी स्टाफ वनडे मालिकेदरम्यान संघासोबत राहणार नाही. सर्वजण कसोटी संघाच्या तयारीकडे लक्ष देतील. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील वनडे संघाच्या जबाबदारीसाठी भारत अ संघातील फलंदाजी प्रशिक्षक सीतोंशू कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक राजीब दत्ता आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.