लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुजरात टायटन्सने ५.८० कोटींत खरेदी केलेला वेगवान गोलंदाज उमेश यादव हा मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांच्या सोबतीने वेगवान मारा करायला मिळणार यासाठी आनंदी आहे. उमेशने २०१५ च्या विश्वचषकात या दोघांच्या सोबतीने भारतासाठी गोलंदाजी केली होती.
‘लोकमत’शी संवाद साधताना उमेश म्हणाला, ‘२०१५ च्या वनडे विश्वचषकात मी या दोघांसोबत ऑस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर मारा केला होता. आता देशांतर्गत खेळपट्ट्यांवर पुन्हा एकदा आमचे त्रिकूट एकत्र येणार आहे.’
दुबईत मंगळवारी झालेल्या लिलावात वेगवान गोलंदाजांच्या खरेदीवर अधिक भर होता, असे सांगून उमेश पुढे म्हणाला, ‘सर्वच वेगवान गोलंदाजांना चांगली रक्कम मिळाली. त्यातही मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य राहिल्याने भाव खाऊन गेले. यंदा स्टार्कची कामगिरी चांगली होईल का, याबद्दल मला शंका वाटते. स्टार्कचे स्थानिक मैदान असलेल्या ईडनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना कधीही पूरक ठरलेली नाही. कोलकाता येथे स्टार्कला वेगवान मारा करताना अधिक त्रास होऊ शकतो.’