मुरादाबाद : मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरूद्ध विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात व्यस्त असताना त्याची आई अंजुम आरा यांची अचानक तब्येत खालावली. त्यांना लगेच इस्पितळात हलविण्यात आले. ताप आणि घाबरल्यासारखे वाटत असल्याने त्यांना भरती करण्यात आल्याची माहिती शमीच्या भावाने दिली.
भारताचा ६ गडी राखून पराभव
विश्वविजयाचा प्रबळ दावेदार बनलेल्या यजमान भारतीय संघाला रविवारी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यासह दहा वर्षांपासून सुरू असलेली आयसीसी जेतेपदाची भारतीयांची प्रतीक्षा कायम राहिली. ऑस्ट्रेलियाने विश्वविक्रमी सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावत क्रिकेटविश्वावरील आपली हुकुमत पुन्हा एकदा सिद्ध केली.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेत भारताचा डाव ५० षटकांत २४० धावांमध्ये संपुष्टात आणला. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ४३ षटकांत ४ बाद २४१ धावा करून सहज पार केले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कांगारूंची ७ षटकांत ३ बाद ४७ अशी अवस्था करत भारताने विजयाच्या आशा कायम ठेवल्या. परंतु, एका बाजूने टिकून राहिलेल्या सलामीवीर हेडने निर्णायक शतक झळकावले. त्याने मार्नस लाबुशेनसोबत चौथ्या गड्यासाठी २१५ चेंडूंत १९२ धावांची भागीदारी करत भारतीयांचे स्वप्न धुळीस मिळवले. संपूर्ण स्पर्धेत चमकलेल्या भारतीय गोलंदाजांची जादू या सामन्यात क्वचितच दिसली. लाबुशेनने संयमी नाबाद अर्धशतक झळकावताना हेडला महत्त्वाची साथ दिली.
त्याआधी, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकानंतरही भारताची मजल मर्यादित ठरली. मिचेल स्टार्कने तीन, तर जोश हेझलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दाेन बळी घेत यजमानांना मर्यादित धावसंख्येत रोखले. सावध सुरुवात केलेल्या भारताला ३० धावांवर शुभमन गिलच्या रूपाने पहिला धक्का बसला. संपूर्ण स्पर्धेत निडरपणे खेळलेला कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. श्रेयस अय्यरही अपयशी ठरल्याने भारताची ११व्या षटकात ३ बाद ८१ धावा अशी अवस्था झाली. कोहली - राहुल या अर्धशतकवीरांनी चौथ्या गड्यासाठी १०९ चेंडूंत ६७ धावांची संयमी भागीदारी केल्याने भारताचे काही प्रमाणात पुनरागमनही झाले. कमिन्सने २९व्या षटकात कोहलीला त्रिफळाचीत केल्यानंतर १ लाख ३० हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये शांतता पसरली. यानंतर राहुलने सूत्रे सांभाळली खरी; परंतु, त्याला आवश्यक धावगतीने फटकेबाजी करता आली नाही. भारताने पहिल्या दहा षटकांत १२ वेळा, तर त्यानंतर ४० षटकांत केवळ चार वेळाच चेंडू सीमापार धाडला. मधल्या फळीत श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांच्या अपयशाचा भारताला फटका बसला.