सिडनी : ‘ऑस्ट्रेलियाचा माजी महान लेगस्पिनर शेन वॉर्न याला खूप वर्षांपासून हृदयरोग होता. तसेच त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर हृदयरोग होण्याची पूर्ण संभावना होती’, असा खुलासा ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचे माजी डॉक्टर पीटर ब्रूकनर यांनी केला आहे. वॉर्नच्या कुटुंबीयांनीही माहिती दिली की, मृत्यूच्या काही आठवडे आधी वॉर्न हृदयासंबंधी आजार आणि अस्थमाने त्रस्त झाला होता. त्याने १४ दिवसांचा लिक्विड डाएटही पूर्ण केला होता.
ब्रूकनर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘वॉर्नला आलेला हृदयविकाराचा झटका हा अचानकपणे आलेला झटका नाही. धूम्रपान, खराब डाएट अशा कारणामुळे गेल्या २०-३० वर्षांपासून हे सुरू होते.’ दखल घेण्याची बाब म्हणजे माजी क्रिकेटपटू आणि वॉर्नचे जवळचे मित्र इयान हिली यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर काही दिवसांनीच ब्रूकनर यांनी माहिती दिल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. हिली यांनी, वॉर्न लवकर आपल्यामधून जाऊ शकतो, याची भीती वाट होती, असे म्हटले होते.
हिली म्हणाले होते की, ‘शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने मी कोलमडलो. पण मला हा प्रसंग येणार असल्याची शंका होती.’ शेन वॉर्नचे यो - यो डाएट आणि मद्यपान व धूम्रपान सवयी पाहता हिली यांना वॉर्नच्या मृत्यूची भीती वाटत होती. त्यामुळेच त्यांनी, ‘शेन वॉर्नच्या लवकर जाण्याचे मला आश्चर्य वाटले नाही’, असेही सांगितले होते.