Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५२ हे वर्ष काही जाण्याचे नव्हते... शेन वॉर्नच्या अचानक एक्झिटने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. नव्वदीच्या क्रिकेट चाहत्यांचा शेन वॉर्न हा नायक होता... त्याच्या फिरकीच्या जादूची मोहिनी सर्वांवरच होती. असा एकही चाहता किंवा क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहणारी व्यक्ती नसेल की ज्याने आयुष्यात एकदा तरी वॉर्नच्या गोलंदाजीची नकल करण्याचा प्रयत्न केला नसावा.. असा हा वॉर्नी अचानक आपल्यातून निघून गेला, परंतु त्याच्या आठवणी मनात नेहमीच कायम राहतील.
कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरननंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत वॉर्नचा क्रमांक आहे. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर वॉर्नने दिलेली ऑफर...
भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यावेळी वॉर्न हा लंडन स्पिरीट संघाचा प्रशिक्षक होता. तेव्हा त्याने MS Dhoni ला लंडन स्पिरीट संघाकडून खेळण्याची ऑफर दिली होती. समालोचकांच्या कक्षात बसलेल्या वॉर्नने दी हंड्रेड लीगमध्ये खेळण्याचा प्रस्ताव ठेवला होता. धोनीला आपल्या संघात घेण्यासाठी बक्कळ पैसा जमवण्याचीही तयारी वॉर्नने दाखवली होती. भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. धोनीने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल खेळतोय आणि त्यामुळे तो परदेशी लीगमध्ये खेळू शकत नाही.
''दी हंड्रेड लीगमध्ये लंडन स्पिरीट संघाकडून पुढील वर्षी महेंद्रसिंग धोनीला खेळताना पाहून मला आनंद होईल. MS जर तू आयपीएलसह देशाबाहेरील लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असशील तर मला तुझ्याकडे यायला आवडेल आणि तू पुढील वर्षी लंडन स्पिरीट संघाकडून खेळशील का?, मी तुझ्यासाठी पैसा गोळा करतो,''असे वॉर्न तेव्हा म्हणाला होता.
Web Title: Shane Warne Death : What Shane Warne said about MS Dhoni after his retirement from international cricket, I will find the money,Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.