आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फिरकीपटूंमध्ये अव्वल स्थानी नाव घेतलं जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न याचं वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झालं. शेन वॉर्नच्या फिरकीवर खेळणं भल्या भल्या फलंदाजाही जमत नसे. वॉर्नच्या एका चेंडूनं इतिहासात नोंद केली होती आणि फलंदाजासह सर्वांनाच अचंबित केलं होतं. शेन वॉर्नचा तो चेंडू 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हणून ओळखला गेला.
ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज फिरकीपटू १४ वर्षांपूर्वी आपली शेवटची कसोटी खेळला. पण आजही तो 'लेग-स्पिनचा राजा' म्हणून ओळखला जात होता. त्यानं टाकलेला एक चेंडू 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हणून ओळखला गेला होता. २८ वर्षांपूर्वी मॅन्चेस्टरमध्ये इंग्लंड विरुद्धच्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा फलंदाज माइक गॅटिंग याला शेन वॉर्ननं अफलातून फिरकीच्या जोरावर क्लिन बोल्ड करत सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. कारण त्यानं टाकलेल्या चेंडूनं चक्क ९० डीग्री अंशात फिरकी घेतली होती आणि गॅटिंगचा त्रिफळा उडाला. माइक गॅटिंग याला तर काही क्षण आपल्यासोबत नेमकं काय घडलंय हेही कळालं नव्हतं.
शेन वॉर्ननं लेग स्टॅम्पपासूनही दूर म्हणजेच वाइट लेन्थच्या टप्प्यावर चेंडू टाकून तो थेट ऑफ स्टम्पचा भेद घेईल अशा ९० डीग्री स्पिननं भयावय चेंडू टाकला होता. शेन वॉर्नचा हाच चेंडू 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हणून ओळखला गेला.