बँकॉक- ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडू शेन वॉर्नच्या अचानक जाण्यानं अनेकांना धक्का बसला आहे. शेन वॉर्नचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु काही जण यावर संशय व्यक्त करत आहे. परंतु थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नच्या पोस्टमोर्टमनंतर त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचं स्पष्ट केले आहे. परंतु आता मृत्युपूर्वीचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यात नवीन बाबी उघड झाल्यात. शेन वॉर्ननं मसाज करण्यासाठी ४ महिलांना बोलावलं होतं. हार्ट अटॅकपूर्वी तो त्या महिलांच्या संपर्कात होता.
शुक्रवारी दुपारी १ वाजून ५३ मिनिटांनी या महिला येतात. त्यातील २ शेन वॉर्नच्या खोलीत जातात तर इतर दोघी वॉर्नच्या मित्रांच्या खोलीत जातात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यानुसार, सर्व दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी खोलीच्या बाहेर पडतात. त्यानंतर २ तास १७ मिनिटांनी म्हणजे ५.१५ वाजता शेन वॉर्न पहिल्यांदा बेशुद्ध अवस्थेत खोलीत पडल्याचं दिसून येते. त्यानंतर तो पुन्हा कधीच उठू शकत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शेन वॉर्नच्या मृतदेहाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट त्यांच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दुतावासाला पाठवला आहे.
शेन वॉर्नच्या कुटुंबीयांनाही मृत्यूबाबत कुठलाही संशय नाही. तर शेन वॉर्नच्या शरीरावर कुठल्याही खूणा नव्हत्या. किंवा घटनास्थळी सामान गायब झाल्याचंही दिसून आलं नाही. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचं सांगितले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जनरल सुराचेत हाकपार्न यांनी दिली आहे. दरम्यान, शेन वॉर्न सुट्टीवर जाण्यापूर्वी २ आठवडे लिक्विड डायटवर होता. त्याच्या छातीत वेदना आणि अंगावर घाम येत असल्याची तक्रार होती. संपूर्ण आयुष्य तो सिगारेट ओढत होता. त्यामुळे त्याला ह्द्रयविकाराचा झटका आला असेल असं वॉर्नच्या मॅनेजरनं खुलासा केला आहे.
शेन वॉर्नच्या जाण्यानं कुटुंबावर शोककळा
वॉर्नच्या कुटुंबीयांनी सोमवारी एक निवेदन जारी केले. त्यात म्हटलंय की, शेन वॉर्नच्या निधनानं आमच्या कुटुंबीयांवर कधीही न संपणाऱ्या वाईट स्वप्नाची सुरुवात झाली आहे. शेनशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही असं त्यांच्या आई वडिलांनी सांगितले आहे. त्याच्यासोबतच्या सुखद आठवणी कदाचित आम्हाला या दु:खातून सावरण्यासाठी मदत करतील असं कुटुंबीयांनी सांगितले आहे.