Join us  

वॉर्न फिरकीचा जादूगार, पण महान गोलंदाज नाही ! : सुनील गावसकर

सुनील गावसकर : ऑस्ट्रेलियन माध्यमांची मात्र जोरदार टीका  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 5:45 AM

Open in App

नवी दिल्ली : शेन वॉर्नने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अद्भुत गोलंदाजी केली. मात्र भारतातील त्याची आकडेवारी बघितल्यावर सार्वकालीन महान गोलंदाज ही उपाधी वॉर्नला देता येणार नाही, असे मत भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.

गावसकरांनी केलेल्या या विधानानंतर ऑस्ट्रेलियन माध्यमांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. असे वक्तव्य करण्याची ही योग्य वेळ नसल्याचे अनेकांचे म्हणणे होते. १९९२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने १४५ कसोटी सामन्यात ७०८  तर १९४ एकदिवसीय सामन्यात २९३ बळी घेतलेले आहेत. इतक्या भरीव कामगिरीमुळेच अनेकांनी वॉर्नला सर्वोत्तम फिरकी गोलंदाजाचे स्थान दिले होते. मात्र गावसकरांना हे मान्य नाही. ते म्हणतात, ‘मुथय्या मुरलीधरन आणि भारताचे फिरकीपटू यांच्यानंतर मी शेन वॉर्नचा क्रमांक लावेन. कारण भारतीय खेळपट्ट्यांवर वॉर्न फारसा प्रभावी ठरला नाही. अनेकवेळा भारतीय फलंदाजांनी त्याला सहज खेळून काढले. केवळ एकदाच त्याला भारतात खेळत असताना नागपूरमध्ये ५ बळी मिळविता आले. त्या तुलनेत मुरलीधरन भारताविरुद्ध जास्त यशस्वी ठरला. त्यामुळेच वॉर्न माझ्यासाठी सर्वाेत्तम महान फिरकीपटू नाही.’ 

विशेष म्हणजे आपल्या मुलाखतीत गावसकरांनी वॉर्नचे कौतुकही केले. ते म्हणाले, ‘वॉर्नच्या मनगटामध्ये जादू होती. इतकी अचूक लेग स्पीन गोलंदाजी करता येणे ही खूप मोठी गोष्ट आहे. वॉर्नच्या बळींची संख्याच त्याचे प्रभुत्व सिद्ध करते. बोटांनी चेंडू वळविणे सोपे असते, मात्र मनगटाच्या जोरावर गोलंदाजी करणे, हे कठीण काम आहे. वॉर्न त्यात पारंगत होता.’

n गावसकरांच्या या मतप्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियन माध्यमांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला. फॉक्स न्यूजने म्हटले की, ‘गावसकरांनी वेेळेचे भान ठेवायला हवे होते. भारतीय दिग्गज खेळाडूकडून हे वर्तन अपेक्षित नव्हते.’ न्यूज डॉट कॉम डॉट एयूने लिहिले की, ‘गावसकरांनी अजब वक्तव्य केले आहे. कारण त्यांनी स्वत:च ही गोष्ट मान्य केली आहे की, गोलंदाजाला प्रभावी लेग स्पीन गोलंदाजी करता येणे, ही सर्वात कठीण गोष्ट आहे.’ n एका ब्रिटिश पत्रकारानेसुद्धा गावसकरांवर टीका केली. तो म्हणाला,  ‘सनी, हे बोलण्याची ही योग्य वेळ नव्हती. या प्रश्नाला उत्तर देणे तुम्ही टाळू शकला असता. अजून वॉर्नवर अंतिम संस्कारसुद्धा झालेले नाहीत.’ 

टॅग्स :शेन वॉर्नसुनील गावसकर
Open in App