- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
शेन वॉर्नचे जाणे हे जास्त धक्कादायक होते. कारण गेल्या काही महिन्यांपासून त्याने उत्तम तंदुरुस्ती राखली होती. थायलंडमध्ये असताना त्याने सकाळी रॉडनी मार्श यांना श्रद्धांजली वाहणारे ट्वीटही केले होते. मात्र, संध्याकाळी नियतीने त्याच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.
वॉर्नला श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा अक्षरश: महापूर आला होता. मात्र, गेल्या शतकातील तो सर्वांत प्रभावशाली क्रिकेटपटू होता, असे कोणीही त्याच्याबद्दल लिहिलेले आढळले नाही. अनेक अडथळ्यांना पार करत वॉर्नने स्वत:च्या कर्णधारपदाखाली आणि प्रशिक्षणाने राजस्थानला आयपीएलचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावून दिले होते. एक कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केले होते. यादरम्यान त्याने रवींद्र जडेजा, शेन वॉटसन, युसूफ पठाण, सोहेल तन्वीर यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटूसुद्धा घडवले.
निर्विवादपणे वॉर्न हा क्रिकेट इतिहासातला सर्वोत्तम फिरकी गोलंदाज होता. तो नेहमीच बळी घेण्यासाठी गोलंदाजी करायचा. आपल्या तंत्रावर विश्वास असलेला आणि महत्त्वाचे म्हणजे फलंदाजांच्या डोक्यात काय सुरू आहे हे वाचू शकणारा तो सार्वकालिक महान खेळाडू होता. समोरचा फलंदाज जितका मोठा तितका वॉर्न अजून खुलायचा. त्याचे टीकाकार बऱ्याच वेळा टीका करतात की, त्याची भारताविरुद्धची कामगिरी फारशी प्रभावी नाही. खासकरून भारतीय खेळपट्ट्यांवर. आकडेवारी बघितली तर यात काही अंशी सत्यताही आहे. पण त्या काळातल्या सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग यांच्यासोबत तुम्ही वॉर्नच्या गोलंदाजीबाबत बोलाल तर तुम्हाला वेगळे उत्तर मिळेल.
१९९८ मध्ये सचिन तेंडुलकरने चेन्नईच्या एमआरएफ अकॅडमीमध्ये वॉर्नचा गोलंदाजी अभ्यास करण्यासाठी लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचे मार्गदर्शन घेतले होते. तेंडुलकरने इतके महत्त्व कोणत्याही इतर गोलंदाजाला दिलेले ऐकिवात नाही. कदाचित वसीम अक्रम सोडून.
वॉर्नच्या दोन आठवणी मला स्पष्टपणे आठवतात...
n पहिली आठवण तेव्हाची आहे, जेव्हा त्याने १९९१-९२ साली भारताविरुद्ध पदार्पण केले होते. त्यावेळीच अनेक पत्रकारांनी त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचे भविष्य म्हणून बघण्यास सुरुवात केली होती. त्या सामन्यात रवी शास्त्रीने (द्विशतक) आणि सचिन तेंडुलकर (शतक) यांनी त्याच्या गोलंदाजीवर १५० धावा चोपल्या. तरीसुद्धा वॉर्नने निराश होऊन आपले खांदे खाली पडू दिले नाही. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियन संघातून काही काळ बाहेरही गेला. मात्र, पुनरागमन केल्यानंतर त्याने १९९३ च्या ॲशेस टेस्टमध्ये माईक गेटिंग यांना बाद करण्यासाठी टाकलेला चेंडू 'बॉल ऑफ द सेंच्युरी' ठरला. वॉर्नने त्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही.
n दुसरा किस्सा आहे तो काही वर्षांपूर्वीचा. जेव्हा मी आणि वॉर्न राजस्थानच्या खेळाडूंसाठी एक सत्र घेत होतोे. अनेक खेळाडूंना त्यांना विचारले जाणारे प्रश्न आधीच मिळालेले आवडतात. मात्र, वॉर्न याबाबतीतही वेगळा. त्याला या सगळ्याची चिंता नसायची. सत्र सुरू होण्यापूर्वी त्याने मला बाजूला नेले आणि म्हणाला, "कुठलाच संकोच मनामध्ये ठेवू नको, तुला हवे ते विचार." मीसुद्धा तेच केले आणि त्यानेसुद्धा सगळ्या प्रश्नांची स्पष्ट, चटकन आणि मुद्देसूद उत्तरे दिली.
विविधरंगी स्वभाववैशिष्ट्यांनी भरलेले पात्र म्हणजे शेन वॉर्न. त्याच्या मित्रमंडळींसाठी त्याच्यात बंडखोरीही होती (कदाचित यामुळेच त्याला कर्णधारपदाची किंमत चुकवावी लागली). पण शेन वॉर्न हा असामान्य मॅचविनर खेळाडू होता. तो क्रिकेटमधला शोमॅन होता आणि कित्येक खेळाडूंसाठी, क्रिकेट चाहत्यांसाठी त्यांना प्रेरणा देणारा त्यांचा आदर्श.
अलविदा...
फार लवकर गेलास मित्रा...
Web Title: Shane Warne is an extraordinary player, a 'great' show man and a role model for many
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.