Shane Warne Last Tweet : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले. फॉक्स क्रिकेटने ही माहिती दिली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने ट्विट करून शोक व्यक्त केला. तसेच काही परदेशी प्रसारमाध्यमांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. वॉर्नच्या मॅनेजमेंट टीमकडूनही एक स्टेटमेंट जारी करून याबाबत माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. वॉर्न थायलंड येथे होता आणि तेथे त्याला हार्ट अटॅक आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
शेन वॉर्नच्या बाबतीत एक विचित्र बाब म्हणजे त्याने जे शेवटचं ट्वीट केलं, ते एका माजी क्रिकेटरच्या मृत्यूचं होतं. 'रॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून दुःख झाले. तो एक महान खेळाडू होता आणि अनेक युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणास्रोत होता. रॉड याला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्याने क्रिकेटमध्ये खूप योगदान दिलं. त्याच्या आत्म्यास शांती लाभो', असं ट्वीट शेन वॉर्नने निधनाच्या १२ तास आधी केलं होतं. पण दुर्दैव म्हणजे, त्याच सायंकाळी शेन वॉर्नचे दु:खद निधन झाले.
"शेन वॉर्न हा त्याच्या व्हिलामध्ये तो उपचारादरम्यान प्रतिसाद देत नव्हता. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनंतरही त्याला पुनरुज्जीवित करता आले नाही," असे त्याच्या मीडिया टीमने जारी केलेल्या निवेदनात नमूद केलं आहे. तसेच, शेन वॉर्नबद्दल सेहवाग शोक व्यक्त करताना म्हणाला, 'विश्वास बसत नाही. जगातील दिग्गज फिरकीपटू, सुपर स्टार शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.''