Shane Warne Mother Emotional Reaction : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न याचा शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. थायलंडमध्ये आपल्या व्हिलामध्ये असताना ही घटना घडली. वैद्यकीय उपचारांनी त्याला पुनरूज्जीवित करण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण त्याने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. शेन वॉर्नच्या अकाली निधनाने साऱ्यांनाच धक्का बसला. शोकसंदेश आणि ट्वीटच्या माध्यमातून त्याला अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी शेन वॉर्न सोबतच्या आठवणी शेअर केल्या. शेन वॉर्नची आई ब्रिजेट वॉर्न यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या मुलाच्या निधनावर त्यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली.
शेन वॉर्नचं निधन अतिशय धक्कादायक होतं. अचानक झालेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरवून सोडलं. त्याच्या कुटुंबीयांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला. आपल्या मुलाच्या मृत्यूचा कोणत्याही आईला धक्का बसणं स्वाभाविकच आहे. शेन वॉर्नची आई ब्रिजेट वॉर्न यांनाही मुलाच्या अचानक निधनाने खूपच मोठा धक्का बसला. 'आम्ही अजूनही खूप मोठ्या धक्क्यात आहोत.. पण तरीही आम्ही स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतो आहोत', अशी भावूक प्रतिक्रिया ब्रिजेट वॉर्न यांनी दिली.
दरम्यान, शेन वॉर्नचा कट्टर प्रतिस्पर्धी पण तितकाच चांगला मित्र असलेल्या सचिन तेंडुलकरने त्याच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. "धक्कादायक, स्तब्ध करणारी आणि मन सुन्न करणारी (बातमी)… वॉर्नी तुझी आठवण येईल. तू आजूबाजूला असताना मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही कंटाळा आला नाही. भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुझं नेहमीच एक खास स्थान होतं. तू फार लवकर आमच्यातून निघून गेलास", असं ट्वीट सचिनने केलं. तर "महान लेगस्पिनर शेन वॉर्न याच्या अकाली निधनामुळे जगाने क्रिकेटमधील सर्वकालीन महान नायक गमावला. त्याची क्रिकेटमधील उल्लेखनीय आणि गौरवशाली कारकीर्द पुढील पिढ्यांसाठी आणि विशेषत: जगभरातील तरुण गोलंदाजांसाठी प्रेरणादायी ठरेल", असं ट्वीट शरद पवार यांनी केलं.
Web Title: Shane Warne Mother Emotional Reaction says We are still in shocked After son death relatives into tears
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.