Shane Warne Tribute, ENG vs NZ 1st Test: लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर २ जूनपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज दिवंगत शेन वॉर्नचे स्मरण करण्यात आले. न्यूझीलंडच्या डावात २३ षटकांनंतर सामना २३ सेकंदांसाठी थांबवण्यात आला आणि शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यात आली. शेन वॉर्नच्या जर्सीचा क्रमांक २३ असल्यामुळे त्याला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. २३वे षटक संपल्यानंतर मैदानावरील स्क्रीनवर शेन वॉर्नचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या दरम्यान, चाहते, खेळाडू आणि अंपायर्स यांनी उभे राहून शेन वॉर्नच्या समृद्ध योगदानासाठी टाळ्या वाजवल्या आणि त्याली अनोखी आदरांजली अर्पण केली.
याच वर्षी मार्चमध्ये झाला होता मृत्यू
शेन वॉर्नचा या वर्षी ४ मार्च रोजी थायलंडमध्ये मृत्यू झाला होता. वयाच्या ५२ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या वॉर्नला हॉटेलच्या खोलीतच हृदयविकाराचा झटका आला. शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्यावेळी ही घटना घडली. त्याच्या उपचार करण्याचे प्रयत्न झाले पण त्याने उपचारांना प्रतिसाद न दिल्याने अखेर त्याला मृत घोषित केले गेले. शेन वॉर्नने त्याच्या १४५ सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत ७०८ बळी घेतले.
गोलंदाजांनी उडवला फलंदाजांचा धुव्वा!
इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा तो निर्णय चुकला. उपाहारापर्यंत त्यांनी ३९ धावांत ६ गडी गमावले. त्यानंतर त्यांचा डाव १३२ धावांवर आटोपला. पदापर्णात मॅटी पॉट्सने ४ तर अनुभवी जेम्स अँडरसननेही ४ बळी टिपले. त्यानंतर इंग्लंडची अवस्थाही काहीशी तशीच झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची अवस्था ७ बाद ११६ झाली. टीम साऊदी, कायल जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट तिघांनी २-२ बळी टिपले.