मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या पार्थिवावर ३० मार्च रोजी मेलबोर्न क्रिकेट मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वॉर्नच्या शानदार कारकीर्दीचे हे मैदान साक्षीदार ठरले आहे. वॉर्नच्या सन्मानार्थ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल अशी घोषणा व्हिक्टोरियाचे पंतप्रधान डॅनियल अँड्र्यूज यांनी बुधवारी केली. वॉर्नचा मागच्या शुक्रवारी थायलंडमधील एका रिसॉर्टच्या खोलीत हृदयविकाराने मृत्यू झाला होता. ५२ वर्षांचा हा खेळाडू येथे मित्रांसोबत काही दिवसांआधी सुट्या घालविण्यासाठी आला होता. वॉर्नच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे.
अँड्र्यूज यांनी ट्विट केले,‘ वॉर्नला निरोप देण्यासाठी एमसीजीपेक्षा दुसरे योग्य स्थान नाही. एमसीजीवर वॉर्नने १९९४ ला ॲशेस मालिकेत हॅट्ट्रिक नोंदविली. २००६ ला अखेरच्या आंतरराष्ट्रीय मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीत याच मैदानावर त्याने ७०० वा बळी देखील घेतला होता. वॉर्नचा जन्म मेलबोर्नमध्येच झाला शिवाय तो याच शहरात लहानाचा मोठा झाला.’
वॉर्नच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्याचा मृत्यू हा नैसर्गिक होता आणि त्यात कुठलाही घातपात नव्हता. शुक्रवारी वॉर्नचे थायलंडमधील समुई बेटावर निधन झाल्यानंतर रविवारी त्याचे पार्थिव सूरत थानी येथे नेण्यात आले. सूरत थानी येथून पार्थिव बॅंकॉकला हलविण्यात आले आहे. तेथून ते ऑस्ट्रेलियाकडे रवाना करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान चार मार्चची ती काळरात्र कधी न संपणाऱ्या स्वप्नासारखी असल्याची प्रतिक्रिया वॉर्नच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
वॉर्नसाठी जिंकणार!
‘शेन वॉर्न यांच्या अनुभवाचा फायदा घेता आला, याचा अभिमान आहे. ते माझ्यासाठी आदर्श होते. त्यांच्यासाठी मला हँपशायरकडून खेळताना चॅम्पियनशीप जिंकायची आहे,’ असे वॉर्नचा शिष्य मेसन क्रेन याने म्हटले.
Web Title: Shane Warne will be buried on March 30
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.