नवी दिल्ली : एखादा षटकार तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतो, एखादा फटका अविस्मरणीय असा असतो. पण एखादा चेंडू फार काळ लक्षात राहत नाही. पण त्याला अपवाद ठरला आहे तो एक चेंडू. ज्या जादुईने चेंडूने आजच्या दिवशी तब्बल 25 वर्षे पूर्ण केली आहेत. शेन वॉर्नचा तो चेंडू अजूनही क्रिकेट चाहता विरसू शकलेला नाही. त्यामुळे त्याच चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ हा दर्जा दिलेला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 4 जून 1993 ला मँचेस्टर येथे एक कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यात ज्यापद्धतीने वॉर्नने माईक गेटिंगला त्रिफळाचीत केले, ते पाहिल्यावर बऱ्याच जणांनी बोटे तोंडात घातली होती. कारण यापूर्वी क्रिकेट जगतात अशी आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली नव्हती. वॉर्नच्या चेंडूने केलेली ही जादु अजूनही क्रिकेट विश्व विसरलेले नाही.
या जादुई चेंडूबाबत वॉर्न म्हणाला की, " माझा चेंडू 'बॉल ऑफ द सेंचुरी' ठरला, याचा मला गर्व आहे. प्रत्येक वेळी आपल्याला चेंडू वेगळा कसा टाकता येईल, असा विचार मी करत होतो. माईक गेटींग हा चांगल्याप्रकारे फिरकी गोलंदाजी खेळायचा. त्याचासारखा फलंदाज माझ्या चेंडूवर फसला, याचा मला आनंद आहे. "