सिडनी : ‘बालपणी एक कसोटी सामना पाहताना ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची इच्छा आईजवळ बालून दाखवली होती. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा करताना गेल्या २० वर्षांत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटल्याने स्वप्नपूर्तीचा आनंद होत आहे,’अशी भावना ऑस्ट्रलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वाॅटसन याने व्यक्त केली. जे स्वप्न पाहिले ते साकार केले. भरपूर आनंद लुटला. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली मानतो, असे ३९ वर्षांच्या वॉटसनने सांगितले. वॉटसनने २०१६ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून, मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियन बिग बॅशमधून आणि यंदा आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करीत यापुढे क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. स्वत:च्या यू ट्यूब चॅनलवर तो म्हणाला, ‘माझी स्वप्नपूर्ती झाली याबद्दल स्वत:ला भाग्यशाली मानतो. हा अध्याय संपवणे कठीण जात आहे, मात्र मी प्रयत्न करीत आहे. मी एका स्वप्नात जगलो, यासाठी सर्वांचे आभार मानतो. आता पुढच्या रोमांचक प्रवासाची तयारी करायची आहे.’वाॅटसनने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ५९ कसोटी, १९० वन डे आणि ५८ टी-२० सामने खेळले. टी-२० प्रकारात त्याची फार मागणी होती. आयपीएलचा तो सुरुवातीपासूनच सदस्य राहिला. आयपीएलच्या १४५ सामन्यात चार शतके आणि २१ अर्धशतकांसह त्याच्या ३,८७४ धावा आहेत. याशिवाय त्याने ९२ गडी बाद केले. मी आपल्या आवडत्या सीएसके संघाकडून अखेरचा सामना खेळलो. निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. अनेकदा जखमी झालो तरी ३९ वर्षे वयापर्यंत खेळत राहिलो याबाबत स्वत:ला ‘लकी’ मानतो. इतक्या लांबलचक प्रवासात माझी सोबत करणारे आईवडील, बहीण निकोल तसेच पत्नीचा आभारी आहे. संघाचे कोच, मेंटॉर, सपोर्ट स्टाफ आणि सहकारी खेळाडू व चाहते यांच्या ऋणात राहणार असल्याचे वॉटसनने सांगितले.आयपीएलमध्ये दोन वेगवगळ्या संघांकडून खेळताना जेतेपद पटकावणारा वॉटसन एकमेव खेळाडू आहे. त्याने २००८ ला पहिल्यावर्षी जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सकडून ४७२ धावा काढल्या शिवाय १७ गडी बाद केले होते. चेन्नईकडून २०१८ ला मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक ठोकून जेतेपदात मोलाची भूमिका बजावली. त्या सत्रात ५५५ धावा काढण्यासह वॉटसनने सहा गडीदेखील बाद केले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Shane Watson : २० वर्षांच्या कारकिर्दीत स्वप्नपूर्तीचा आनंद लुटला
Shane Watson : २० वर्षांच्या कारकिर्दीत स्वप्नपूर्तीचा आनंद लुटला
Shane Watson : वाॅटसनने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ५९ कसोटी, १९० वन डे आणि ५८ टी-२० सामने खेळले. टी-२० प्रकारात त्याची फार मागणी होती.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 6:16 AM