- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
तीन कडव्या लढतीनंतर भारतासाठी विश्वचषकात अफगाणिस्तान तुलनात्मकदृष्टया कमकुवत प्रतिस्पर्धी ठरू शकतो. माझ्यामते भारतीय संघ अफगाणिस्तनला कमकुवत मानणार नाही. भारताला सध्या विरोधी संघापेक्षा स्वत:च्या कामगिरीवर फोकस करायचा आहे.
भारताला शिखर धवनच्या अनुपस्थितीत खेळावे लागणे मोठा धक्का आहे. चार वर्षांत एकदा होणारी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक मोठी स्पर्धा असल्याने प्रत्येक खेळाडू अपेक्षा बाळगून आणि स्वप्ने जोपासून खेळतो. धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकवून इरादे जाहीर केले होते. जखमी होताच विश्वचषकातील त्याची ‘एक्झिट’ चाहत्यांवर अघात करणारी ठरली.
लोकेश राहुलला स्पर्धेत छाप पाडण्याची हीच संधी आहे. रोहित-शिखर यांच्या उपस्थितीत राहुलला राखीव बाकावर बसण्याखेरीज पर्याय नव्हता. मधल्या फळीत संधीची आशा धुसर होती. पण आता या युवा खेळाडूकडे सलामीचा फलंदाज म्हणून धावा काढण्याची संधी असेल. पाकविरुद्ध अर्धशतक ठोकून पुढील सामन्यात आत्मविश्वासाने खेळण्यास तो सज्ज झाला आहे.
भुवनेश्वरची दुखापतही संघासाठी मोठा धक्का आहे. तथापि स्पर्धेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर भुवी संघात परत येईल, असा विश्वास वाटतो. दरम्यान त्याची उणीव भरून काढण्यासाठी मोहम्मद शमी आहेच. यामुळे भुवनेश्वरला मांसपेशींच्या दुखण्यातून सावरण्यास पुरेसा वेळ मिळेल. दुसरीकडे शमीला देखील स्वत:ची तंदुरुस्ती टिकविण्याची संधी मिळणार आहे.
फलंदाजीत विजय शंकर आणि केदार जाधव यांना फलंदाजीत अधिकाधिक संधी देण्याची गरज आहे. यामुळे संघाच्या फलंदाजीचा क्रम परिस्थितीनुसार बदलणे शक्य होणार आहे. हार्दिकला चौथ्या स्थानावर पाठविण्याचा व्यवस्थापनाने योग्य निर्णय घेतला. इंग्लंडकडून मोठ्या फरकाने हरलेला अफगाणिस्तान संघ विखुरलेला दिसतो. संघात मतभेद असल्याची चर्चा आहे. गोलंदाजीत महागडा ठरलेल्या राशिदला स्वत:ची कामगिरी सुधारावी लागेल. भारताविरुद्ध गोलंदाज प्रभावी ठरले नाहीत तर या संघाला आणखी एका पराभवाचे तोंड पहावे लागू शकते.
Web Title: Shankar-Kedar has the opportunity to bat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.