सिलहट - कर्णधार नजमुल हुसेन शंटो याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर बांगलादेशनेन्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ६८ षटकांत ३ बाद २१२ धावा करताना २०५ धावांची आघाडी घेतली. दिवसअखेर नजमुल शंटो (नाबाद १०४) आणि मुशफिकूर रहीम (नाबाद ४३) मैदानावर होते.
बांगलादेशला पहिल्या डावात ८५.१ षटकांत ३१० धावांवर रोखल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ८ बाद २६६ धावा केल्या होत्या. तेथून पुढे खेळताना काईल जेमिसन (२३) आणि टीम साऊदी (३५) यांनी न्यूझीलंडला ३१७ पर्यंत नेले. पहिल्या डावात न्यूझीलंडला अवघ्या सात धावांची निसटती आघाडी मिळाली. बांगलादेशकडून तैजूल इस्लामने चार, मोमीनूल हक याने तीन तर शोरीफुल इस्लाम, मेहदी हसन मिराज आणि नईम हसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. बांगलादेशच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. झाकिर हसन (१७), महमदुल हसन जाॅय (८) हे दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले. त्यानंतर नजमुल हुसेन शंटो आणि मोमीनूल हक यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९० धावा जोडत संघाचा डाव सावरला. हक धावबाद झाल्याने ही जोडी फुटली. त्याने ४० धावांचे योगदान दिले. त्यानंतर शंटोने मुशफिकूर रहीम याच्या साथीत चौथ्या गड्यासाठी नाबाद ९६ धावा जोडून संघाला दोनशेपार नेले. नजमुल शंटोने १९३ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद १०४ धावा केल्या तर रहीमने ७१ चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.
कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत शतक झळकावणारा शंटो बांगलादेशचा पहिला क्रिकेटपटू ठरला. शंटोचे हे पाचवे कसोटी शतक ठरले.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश (पहिला डाव) : ८५.१ षटकांत सर्वबाद ३१० न्यूझीलंड (पहिला डाव) : १०१.५ षटकांत सर्वबाद ३१७ बांगलादेश (दुसरा डाव) : ६८ षटकांत ३ बाद २१२ (नजमुल शंटो खेळत आहे १०४, मुशफिकूर रहीम खेळत आहे ४३).
Web Title: Shanto's century gives Bangladesh the lead, New Zealand's first innings ends with 317 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.