मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला महेंद्रसिंग धोनी याला कर्णधार करण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला होता. त्यावेळी परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की धोनीला कर्णधार करण्याशिवाय पर्याय नव्हता. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडने धोनीला एक संधी देण्याचा सल्ला दिल्यानेच त्याला कर्णधार करण्यात आलं असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी धोनीचं तोंडभरुन कौतुक करताना झारखंडने दिलेला उत्तम कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी असं म्हटलं आहे. देशाच्या क्रिकेटचं नाव धोनीने जगभरात नेलं असल्याची कौतुकाची थापही त्यांनी यावेळी दिली.
शरद पवार यांनी यावेळी बोलताना धोनीला कशा प्रकारे कर्णधार करण्यात आलं याचा किस्सा सांगितला. ते बोलले की, 'मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. त्यावेळी भारतीय संघ लंडनमध्ये होता. एक दिवस सकाळी राहुल द्रविड हॉटेलमध्ये माझ्या रुममध्ये आला. त्याने मला कर्णधारपद सोडायची इच्छा असल्याचं सांगितलं. मी त्याला कर्णधारपद का सोडतोयस असं विचारलं ? त्याने सांगितलं माझं लक्ष केंद्रित होत नाही. माझ्यावर दबाव येतो. दबावातून काढायचं असेल तर मला यातून मुक्त करा. मी त्याला विचारलं आता आपण लंडनमध्ये आहोत, नंतर दक्षिण अफ्रिकेत जायचं आहे तर मग कर्णधार कोणाला करायचं. त्याने सचिन तेंडुलकरला विचारायला सांगितलं. पण सचिननेही नकार दिला. त्याने सांगितलं की, मी आधीच ही जबाबादारी नाकारली होती. माझ्या खेळावर परिणाम होतो'.
दोघांनी नकार दिल्याने शरद पवार अस्वस्थ झाले होते. त्यांनी सचिन तेंडुलकरला विचारलं की, 'तू घेत नाही राहुलही घेत नाही तर मग कर्णधार कोणला करु. तेव्हा त्याने झारखंडच्या एका मुलाचं नाव सुचवलं. ते नाव होतं महेंद्रसिंग धोनी'. पण शरद पवार साशंक होते. त्यांनी दोघांना विचारलं, 'फारशी माहिती नसलेलं नाव तुम्ही घेता'. तेव्हा दोघांनीही धोनीला एक संधी देण्याचा सल्ला दिला.
'यानंतर मी आणि सिलेक्शन कमिटी चेअरमनने निर्णय घेतला आणि धोनीला कर्णधार केलं', असा खुलासा शरद पवार यांनी केला. 'झारखंडच्या लहान राज्यातील या खेळाडून देशाच्या क्रिकेटच्या जबाबदारी घेण्यासाठी पुढे आला. देशाच्या क्रिकेटचं नाव धोनीने जगभरात नेलं. लहान लहान राज्यातही उत्तम प्रकारचे खेळाडू असतात हा अनुभव झारखंडसारख्या राज्यातून मिळाला', असं कौतुक त्यांनी यावेळी केलं.