पुणे - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेला यंदा २०२३ पासून सुरुवात केली. या स्पर्धेत एकूण सहा संघ असून आज अंतिम सामना खेळला जात आहे. पुणेरी बाप्पा, ईगल नाशिक टायटन्स, कोल्हापूर टस्कर्स, छत्रपती संभाजी किंग्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स या ६ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला बीसीबीआयचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी हजेरी लावली. त्यांच्याच हस्ते फुगे अवकाशात सोडून या स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरूवात करण्यात आली.
रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) आणि कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) संघात एमपीएलचा अंतिम सामना सुरू झाला आहे. शरद पवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवत एमपीएल स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यावेळी, रोहित पवार यांच्यासह मंत्री उदय सामंत आणि दिग्गज मैदानावर उपस्थित होते. शरद पवारांनी यावेळी, आयपीएल स्पर्धेच्या आठवणी सांगितल्या. तसेच, पुण्यातील गहुंजे आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होत असल्याने स्टेडियम उभारणाऱ्या शिर्के बंधुंचाही पवारांनी विशेष उल्लेख केला.
मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना २००७ मध्ये आम्ही आयपीएल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेच्या माध्यमातून भारताने एक मोठा लौकिक मिळवला. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र प्रिमियर लीग सुरु झाले, याचा मला विशेष आनंद आहे. या खेळाचे सामने ज्या स्टेडियमध्ये होत आहेत त्यासाठी अजय शिर्के आणि विजय शिर्के या बंधूंनी कष्ट घेतले, कमी कालावधीत सुंदर स्टेडियम बांधले, त्यामुळे त्यांचा उल्लेख इथे करणे आवश्यक आहे. रोहीत पवार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सहकाऱ्यांनी हा जो उपक्रम सुरु केला आहे, याला माझ्या नेहमीच शुभेच्छा राहतील, असे शरद पवार यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटले आहे.
दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वीच मैदानात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे अंतिम सामन्यात व्यत्यय येऊ शकतो, याची कल्पना आयोजिक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएसनला आधीच होती. जर पावसामुळे व्यत्यय आला तर किमान ५ षटकांचा सामना होईल. तेही शक्य नसल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल. पावसामुळे सुपर ओव्हर देखील खेलवता आली नाही, तर मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी हा सामना खेळवला जाईल. राखीव वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन अशी आहे.
एकदा सुरू होऊन पावसामुळे सामना रद्द झाला, तर दुसऱ्या दिवशी जिथे खेळ थांबला होता तिथूनच खेळ सुरू होईल. सलग दोन दिवस सामना खेळवताच आला नाही, तर आयोजकांना गुणतालिकेच्या आधारे विजेतेपदाची घोषणा करावी लागले. सध्या रत्नागिरी जेट्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.
Web Title: Sharad Pawar's MPL remembers the establishment of IPL when I was president
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.