Join us  

‘ये हाथ हमको दे दे ठाकूर’; शार्दुलची सलग तीन कसोटींत अर्धशतके

शार्दुलने सामन्यात स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटवीत आपली निवड सार्थ ठरविली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 8:19 AM

Open in App

अभिजित देशमुख, लंडन : डब्ल्यूटीसी फायनलसाठी अंतिम एकादशची घोषणा झाली आणि त्यात आर. अश्विनऐवजी शार्दुल ठाकूरचा समावेश करण्यात आल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. केवळ आठ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या शार्दुलने काही निर्णायक खेळी केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १३० धावांत अर्धा संघ गमावला होता. पण, शार्दुलचा लढा शिल्लक होता. त्याने तिसऱ्या दिवशी ५१ धावांचे योगदान देत सलग तीन कसोटींत अर्धशतके ठोकण्याचा विक्रम केला. २०२१ ला याच ओव्हलवर त्याने दोन अर्धशतकांची नोंद केली होती. आज पुन्हा अर्धशतक ठोकून इंग्लंडमध्ये विशेष कामगिरी करू शकतो, हे सिद्ध केले.

आजच्या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा चेंडू दोनदा त्याच्या हातावर आदळला. त्यावर उपचार घेत त्याने आर्मपॅड बांधले. आग ओकणाऱ्या वेगवान चेंडूंचा सामना करीत त्याने अजिंक्यसोबत शतकी भागीदारी केली आणि भारताला फॉलोऑनच्या नामुष्कीतून बाहेर काढले. रहाणे बाद झाल्यानंतरही तो डगमगला नाही. त्याची फटकेबाजी पाहताना २०२१ ला इंग्लंडविरुद्ध खेळलेला शार्दुल पुन्हा दृष्टीस पडला. ब्रिस्बेन असो वा ओव्हल, शार्दुलच्या समर्पित वृत्तीत बदल झालेला नाही.

ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज बाद केल्यानंतर ५१ धावांचे योगदान देणाऱ्या शार्दुलने सामन्यात स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटवीत आपली निवड सार्थ ठरविली. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या तोंडून अलगद निघाले असावे- ‘ये हाथ हमको दे दे ठाकूर..!’

 

टॅग्स :शार्दुल ठाकूरभारतीय क्रिकेट संघ
Open in App