Join us

'लॉर्ड' शार्दुल ठाकूरचा सामना करणं झालं 'हार्ड'; पठ्य़ानं गोलंदाजी करताना मारला 'सिक्सर'

हरयाणाविरुद्धच्या सामन्यात त्याने सहा विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:25 IST

Open in App

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित अशा रणजी करंडक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळलेले अनेक चेहरे मैदानात उतरले आहेत. रणजी सामन्यात धमक दाखवून टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी दरवाजे ठोठावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शार्दुल ठाकूर आघाडीवर आहे. मुंबईच्या संघाकडून खेळताना रणजी स्पर्धेत या पठ्ठ्यानं बॅटिंग-बॉलिंगमध्ये सर्वोच्च कामगिरी करुन दाखवत बीसीसीआय निवडकर्त्यांचे लक्षवेधून घेतले आहे. रणजी सामन्यातील प्रत्येक मॅचमध्ये खास छाप सोडून कसोटी संघात पदार्पणासाठी तो आपली दावेदारी भक्कम करताना दिसतोय. आता हरयाणाविरुद्धच्या सामन्यात त्याने सहा विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आधी सलामी जोडी फोडली, मग मध्यफळीसह तळाच्या फंलंदाजीलाही लावला सुरूंग

३३ वर्षीय स्टार अष्टपैलू खेळाडूनं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर  रणजी क्वार्टरफायनलच्या लढतीत संघाला अल्प आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. हरयाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना ३१५ धावा केल्या. त्यानंतर हरयाणाच्या संघानं आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. सलामीवीरांनी ८७ धावांची भागीदारी रचत मुंबईच्या संघाला तगडी फाईट देण्याचे संकेत दिले. ही जोडी जमली असताना शार्दुल ठाकूर आला अन् त्याने  लक्ष्य दलालची विकेट घेत संघाला पहिलं यश मिळवून दिले. त्यानंतर मध्यफळीतील फलंदाजीसह तळाच्या फलंदाजीला त्याने सुरुंग लावला. शार्दुल ठाकूरच्या भेदक माऱ्यासमोर हरयाणाचा संघ ३०१ धावांत ऑलआउट झाला.  

इंग्लंड दौऱ्यासाठी 'जॅकपॉट' लागणार? 

शार्दुल ठाकूरनं हरयाणाविरुद्धच्या लढतीत १८.५ षटके गोलंदाजी करताना ५८ धावा खर्च करत ६ विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने ३ निर्धाव षटकेही फेकली. शार्दुल ठाकूरशिवाय शम्स मुल्लानी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या. सातत्यपूर्ण दमदार कामगिरीमुळे आता सोशल मीडियावरही लॉर्ड शार्दुल ठाकूरचं वारं वाहू लागलं आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी शार्दूल ठाकूरला भारतीय संघात स्थान मिळायला हवे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. .व्हाइट बॉलमध्ये फ्लॉप, पण रेड चेंडूवर धमाक्यावर धमाका

देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या मर्यादीत षटकांच्या स्पर्धेतही शार्दुल ठाकूर मैदानात उतरला. पण व्हाइट बॉलवर खास छाप सोडण्यात तो कमी पडला.  विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने ७ सामन्यात १० विकेट्स घेतल्या. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याच्या खात्यात १५ विकेट्स जमा झाल्या. रणजी स्पर्धेत त्याने आपली कामगिरी अधिक उच्च स्तरावर नेली. मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्याने हॅटट्रिकची किमया साधली. हरयाणाविरुद्धच्या सहा विकेट्स सह शार्दुल ठाकूरनं यंदाच्या रणजी हंगामात ३० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. याशिवाय बॅटिंगमध्ये ९ डावात त्याने ३९६ धावाही कुटल्या आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

टॅग्स :शार्दुल ठाकूररणजी करंडक