नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहली अंतिम एकादशचे संयोजन कसे करेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शार्दुल ठाकूरसह पाच वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणे किंवा उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर अजिंक्य रहाणे याला अतिरिक्त फलंदाज म्हणून संधी देणे, हा विराटकडे पर्याय असेल. फलंदाजीचा पर्याय निवडायचा झाल्यास हनुमा विहारी हा देखील प्रबळ दावेदार ठरू शकेल. विहारी भारतीय अ संघासोबत द.आफ्रिकेत खेळला.
भारतीय संघ दोन दिवसापासून सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कवर सराव करीत आहे. यजमान संघाने पाहुण्या संघाला मुख्य स्टेडियमवर सरावाची संधी दिली, हे विशेष. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशात कसोटी आधी मुख्य खेळपट्टीवर सराव करण्याची संधी फार कमी मिळते.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओत मुख्य कोच राहुल द्रविड यांनी मुख्य खेळपट्टीवर सरावाचे फायदे सांगितले. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने गवताळ खेळपट्टीवर सरावाबाबत मत मांडले. रणनीतीबाबत कोहलीला आक्रमक कर्णधार म्हटले जाते. तो पाच वेगवान गोलंदाजांसह कसोटी मालिकेला सामोरे जाणे पसंत करेल. डावखुरा रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर फलंदाजीला येणे शानदार पर्याय ठरू शकेल. त्याच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूर ही जबाबदारी सांभाळेल.
निवड समितीचे माजी प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले,‘माझ्या मते, भारतीय संघ पाच गोलंदाजांसह खेळणार असेल तर शार्दुल फार चांगला पर्याय ठरतो. तो सातव्या स्थानावर चांगली फलंदाजीही करू शकतो. आमच्याकडे रविचंद्रन अश्विन हाही पर्याय आहे. संघात चार गोलंदाज जवळपास ठरलेले आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अश्विन व मोहम्मद सिराज यांचे खेळणे निश्चित मानले जाते, पण फॉर्म बघता ईशांतला सिराजऐवजी स्थान मिळू शकते.
- सेंच्युरियनचे मैदान समुद्रसपाटीपासून १४०० मीटर उंचीवर आहे. येथे गोलंदाजांना लवकर थकवा जाणवतो. चार गोलंदाज असतील तर थकवा येण्याची शक्यता कमी असते. अतिरिक्त फलंदाजांबाबत विचार झाल्यास विहारीच्या तुलनेत अनुभवी रहाणे प्रबळ दावेदार असेल. विहारीला भारतात झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत खेळता आले नव्हते. तो द.आफ्रिकेत भारतीय अ संघासोबत होता. त्याने येथे क्रमश: ५४, नाबाद ७२ आणि ६३ धावा ठोकल्या. रहाणेलादेखील स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळू शकते.