Shardul Thakur, IPL 2022 Delhi Capitals vs Punjab Kings : शार्दुल ठाकूरने घेतलेले ४ बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी मिळालेली साथ याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा अष्टपैलू मिचेल मार्श याने झुंजार अर्धशतकी खेळी करत संघाला १५९ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात वरच्या फळीने निराश केल्यानंतर पंजाबच्या जितेश शर्माने ४४ धावा करत संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण मोक्याच्या क्षणी शार्दुलने पंजाबला एकाच षटकात दोन धक्के देत सामना फिरवला. पंजाबविरूद्धच्या विजयासह दिल्लीच्या संघाने १४ गुणांसह टॉप-४ मध्ये प्रवेश केला. आता दिल्लीचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सशी रंगणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर शून्यावर बाद झाला. त्यानंतर सर्फराज खान आणि मिचेल मार्श यांनी फटकेबाजी केली. सर्फराज खानने १६ चेंडूत ३२ धावांची वेगवान खेळी केली. ललित यादवनेही २१ चेंडूत २४ धावा काढल्या. कर्णधार रिषभ पंत (७) आणि रॉवमन पॉवेल (२) यांनी चाहत्यांची निराशा केली. पण मिचेल मार्शने अर्धशतक ठोकत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साथीने ४८ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने १५९ धावांपर्यंत मजल मारली.
दिल्लीने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टोने दमदार सुरूवात करून दिली. तो १५ चेंडूत २८ धावां काढून बाद झाला. पण त्यानंतर मात्र पंजाबच्या इतर फलंदाजांनी प्रचंड निराशा केली. शिखर धवन (१९), भानुका राजपक्षे (४), लियम लिव्हिंगस्टोन (३), हरप्रीत ब्रार (१), कर्णधार मयंक अग्रवाल (०), रिषी धवन (४) सारेच झटपट बाद झाले. जितेश शर्माने फटकेबाजी करत पंजाबच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण शार्दुल ठाकूरने त्याला बाद करत त्यांच्या आशा संपवल्या. त्याने ३४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार खेचत ४४ धावा केल्या. त्यामुळे पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला.