- अभिजित देशमुख, लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलवर सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी फायनलच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी दिग्गज काँग्रेस नेते शशी थरूर यांनी स्टेडियमवर उपस्थिती दर्शवीत कसोटीचा आनंद लुटला. यावेळी निवडक पत्रकारांशी त्यांनी संवादही साधला. आपण क्रिकेटचे फॅन असल्यामुळे टीम इंडियाचा खेळ पाहण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४६९ धावांना उत्तर देताना भारतीय संघाची चहापानापर्यंत वाटचाल कशी राहील, याबाबत विचारताच ते गमतीने म्हणाले, ‘काल मी येथे नव्हतो, म्हणून इतक्या मोठ्या धावा झाल्या. आज माझ्या उपस्थितीमुळे प्रतिस्पर्धी संघ केवळ ४६९ धावांत बाद झाला. अनेक जण ५०० चा अंदाज व्यक्त करीत होते.
भारताने आघाडीचे फलंदाज लवकर गमावल्याने संघ नाजूक स्थितीत आला. तरीही भारतीय फलंदाज मुसंडी मारतील आणि घसरगुंडी थोपविण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वास थरूर यांनी व्यक्त केला. थरूर यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ अगदी एकाग्रचित्ताने पाहिला. प्रत्येक सामन्यानंतर ते स्वत: देहबोलीतून प्रतिक्रिया देताना दिसले. थरूर यांची उपस्थिती प्रेक्षागॅलरीतील इतरांसाठीही चर्चेचा विषय राहिली. त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.