शास्त्री आणि कोहली ठरत आहेत भारतीय क्रिकेटचे 'गेम'मेकर

कोहलीच्या मनासारखं झालं. शास्त्रीसारखा त्याच्या देहबोलीला, विचारांना आणि एकंदरीत बऱ्याच गोष्टींमध्ये साधर्म्य असलेला गुरू कोहलीला मिळाला आणि त्यानंतर सुरू झाले हुकूमशाहीचे पर्व.

By प्रसाद लाड | Published: October 9, 2018 04:52 PM2018-10-09T16:52:28+5:302018-10-09T16:54:04+5:30

whatsapp join usJoin us
Shastri and Kohli are dictatorships on Indian cricket | शास्त्री आणि कोहली ठरत आहेत भारतीय क्रिकेटचे 'गेम'मेकर

शास्त्री आणि कोहली ठरत आहेत भारतीय क्रिकेटचे 'गेम'मेकर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देएकीकडे जो खेळाडू दोन्ही डावांत मिळून शून्य धावा करतो, त्याला संघात स्थान मिळते आणि दुसरीकडे त्रिशतकवीर फलंदाज दीड वर्ष फक्त पर्यटक राहतो. शास्त्री आणि कोहली हुकूमशाहीमुळेच करुणचा बळी गेला आहे, हे मात्र नक्कीच.

मुंबई : लोकशाहीच्या नावावर बऱ्याचदा हुकूमशाहीचाच प्रत्यय आपल्याला येतो. भारतीय क्रिकेट संघही या गोष्टीला अपवाद नक्कीच नाही. कारण भारतीय संघात प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांचाच एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याचे आता चव्हाट्यावर आले आहे. कारण आता निवड समितीचे निर्णयही शास्त्रीच घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटवर या दोघांचेच राज्य असून त्यांना कुणीही जाब विचारत नसल्याचं समोर येत आहे.
काही गोष्टी आता साऱ्यांना समजत असतीलही, पण या गोष्टी बऱ्याच कालावधीपासून घडत आहेत. अगदी शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यापासून. आता जरा तो काळ आठवून पाहा. अनिल कुंबळे हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी भारतीय संघासाठी चांगले निकालही दिले होते, अगदी शास्त्री यांच्यापेक्षाही चांगले. पण तरीही कोहली आणि त्यांची रास काही जुळत नव्हती. दोघांची विचार करण्याची, राहण्याची, वागण्याची पद्धत भिन्न. त्यांची देहबोलीही भिन्न वाटत होती. कुंबळे यांचा कार्यकाळ जसा संपत आला तसं कोहलीने डोकं वर काढलं. चॅम्पियन्स करंडकातील अंतिम फेरीत पाकिस्तानकडून झालेला पराभव हा त्याचाच परिपाक होता. कुंबळे आणि संघ व्यवस्थापनाने जो निर्णय घेतला होता, त्याविरुद्ध कोहली मैदानात निर्णय घेऊन मोकळाही झाला. कसलीही तमा त्याने बाळगली नाही. त्यानंतर काय झाले, हे चाहत्यांना माहितीच आहे. पराभव झाल्यावर नवीन प्रशिक्षकाची सुरुवात कोहलीच्या अहंकारामुळेच सुरू झाली. कारण कुंबळे यांची वर्षभराची कामगिरी पाहिली तर त्यांची विजयाची सरासरी ही सर्वोत्तम अशीच होती.
आले कोहलीच्या मना ते कुणीच थांबवेना. त्यानुसार प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले गेले. शास्त्री यांनी सुरुवातीला अर्ज भरला नव्हता. त्यांच्यासाठी अर्ज मागवण्याची मुदत वाढवण्यात आली. त्यावेळीच शास्त्री हे भारताचे मुख्य प्रशिक्षक होणार हे साऱ्यांनाच समजले होते, त्यावर शिक्कामोर्तब काही दिवसांत झालं. कोहलीच्या मनासारखं झालं. शास्त्रीसारखा त्याच्या देहबोलीला, विचारांना आणि एकंदरीत बऱ्याच गोष्टींमध्ये साधर्म्य असलेला गुरू कोहलीला मिळाला आणि त्यानंतर सुरू झाले हुकूमशाहीचे पर्व.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. त्याचे कारण सराव सामना नसल्याचे शास्त्री आणि कोहली यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार इंग्लंडमध्ये सराव सामना खेळवण्याची तजवीजही केली. पण लाजिरवाणा पराभव भारताच्या पदरी पडला. बीसीसीआयने शास्त्री आणि कोहली यांचे बरेच हट्टही पुरवले, पण निकाल काही भारताच्या बाजूने लागला नाही.
जेव्हा गुणवत्ता, परिस्थिती, प्रतिस्पर्धी, वातावरण या गोष्टींकडे न पाहता जेव्हा तुम्ही स्वत:चे घोडे दामटवत बसता तेव्हा तुम्ही बऱ्यादचा तोंडावर पडता. हेच कोहली आणि शास्त्री यांचे इंग्लंड दौऱ्यात झाले. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना खेळवण्याचा अट्टहास त्यांनी केला. करुण नायर, रवींद्र जडेजा यांना संघाबाहेर ठेवण्याचा डावही त्यांनी आखला. करुण नायरसारखा गुणवान खेळाडू दीड वर्ष संघाबरोबर राहतो आणि तरी त्याला एकदाही खेळायला मिळत नाही, याला काय म्हणायचे? संधी मिळत नसतानाही करुणबरोबर निवड समिती इंग्लंडमध्ये काय संवाद साधत होती, याचं उत्तरही मिळत नाही. एवढं सगळं रामायण घडून करुणला संधी मिळाली नाहीच, तर त्याला संघातूनही बाहेर काढण्यात आलं. हा नेमका कुठला न्याय. एकीकडे जो खेळाडू दोन्ही डावांत मिळून शून्य धावा करतो, त्याला संघात स्थान मिळते आणि दुसरीकडे त्रिशतकवीर फलंदाज दीड वर्ष फक्त पर्यटक राहतो. शास्त्री आणि कोहली हुकूमशाहीमुळेच करुणचा बळी गेला आहे, हे मात्र नक्कीच.
संघाच्या निवड समितीचे निर्णयही शास्त्री आणि कोहलीच घेत असल्याचेही आता समोर आले आहे. कारण निवड समितीमध्ये जास्त अनुभव असलेली आणि शास्त्री-कोहली जोडीला त्यांना त्यांच्याच भाषेत सांगणारी एकही व्यक्ती नाही. त्यामुळे निवड समितीची डाळ शास्त्री आणि कोहली यांच्यापुढे शिजताना दिसत नाही.
निवड समितीचे कर्तृत्व नेमके काय...
निवड समितीचे अध्यक्षपद एमएसके प्रसादकडे आहे. या महाशयांकडे फक्त सहा कसोटी आणि १९ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सामने रवींद्र जडेजा, आर. अश्विन हे खेळले आहेत. त्याचबरोबर कुलदीप यादवसारखा युवा गोलंदाजही त्यांच्यापेक्षा पुढे आहे. उद्या प्रसाद यांनी जर कुलदीपवर टीका केली, तर तो वयाचा मान ठेवेलही, पण त्यानंतर जर कुलदीपने तुम्ही माझ्याएवढे सामने खेळा आणि बोला, असं म्हणाला तर प्रसाद काय करतील? याचे उत्तर प्रसाद यांच्याकडे आहे का? काही महिन्यांपूर्वी प्रसाद यांनी महेंद्रसिंग धोनीबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर चाहत्यांनी त्यांना चांगलाच प्रसाद दिला होता. त्यामुळे निवड समितीचे कर्तृत्व नेमके काय आहे, याचे उत्तर बीसीसीआयने आतातरी द्यायला हवे.


जतिन आणि गगन यांच्यापेक्षा पृथ्वी शॉदेखील सरस ठरू शकतो
भारतासाठी एकही कसोटी सामना न खेळणारे जतिन परांजपे आणि गगन खोडा हे निवड समिती सदस्य कसे बनू शकतात, याचे उत्तर बीसीसीआयने द्यायला हवे. जतिन आणि गगन यांनी एकही कसोटी सामना खेळला नाही, तर ते भारताचा कसोटी संघ कोणत्या जीवावर निवडू शकतात? याचे उत्तम जतिन आणि गगन यांच्यासह निवड समिती आणि बीसीसीआय यांनी द्यायला हवे. कसोटी क्रिकेटचा विचार करायचा झाला तर या दोघांपेक्षा पृथ्वी शॉ हादेखील सरस ठरू शकतो. तो जर उद्या म्हणाला की, तुम्हाला कसोटी क्रिकेटमधलं काय कळतं, किती कसोटी सामने तुम्ही खेळला आहात? तर जतिन आणि गगन तोंडघशी पडतील. या साऱ्या गोष्टींचा फायदा उचलला तो शास्त्री आणि कोहली यांनी.


सचिनसारखे दिग्गजही गप्प
आम्हाला कुणीही प्रश्न विचारायचे नाही. हे शास्त्री आणि कोहली यांचं धोरण. आणि कुणी अभ्यासपूर्ण प्रश्न विचारला तर त्याला राजकारण्यांपेक्षा उत्तम बगल देण्यात हे दोघेही माहिर आहेत. त्यामुळे बीसीसीआय, निवड समिती यांचे शास्त्री आणि कोहली यांच्यापुढे काहीच चालत नाही. बीसीसीआयच्या क्रिकेट सुधारणा समितीमध्ये तर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण सारखे दिग्गज आहेत. पण या तिन्ही दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी तरी या प्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे. पण या तिन्ही क्रिकेटपटूंना आपल्या खासगी कामांमधून वेळ मिळत नसल्याचेच समोर येत आहे.


शास्त्री यांचा बेमुर्वतखोरपणा
शास्त्री हे आक्रमक आहेत, हे साऱ्यांना माहिती आहे. पण त्यांचा बेमुर्वतखोरपणाही काही दिवसांपुढे समोर आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर शास्त्री यांची चौकशी करण्यात आली. यावेळी भारताचे पराभवाचे कारण हे नाणेफेक असल्याचा जावईशोध शास्त्री यांनी लावला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा नाणेफेक महत्त्वाची होती, असे शास्त्री यांना म्हणायचे असेल तर काहीही सांगणे न बरे. समोरच्या व्यक्तीला काहीही भूलथापा मारत आपल्या म्हणणं पटवण्यात शास्त्री माहिर असल्याचेच यावेळी दिसून येत आहे. आपण काहीही करावे, कुणी काहीही विचारावे, आम्हाला जे सांगायचे किंवा करायचे आहे तेच आम्ही करणार, हे शास्त्री यांनी या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


कोहली जेव्हा अनाकलनीय बोलतो तेव्हा...
करुण नायरला वगळल्यावर चहूबाजूंनी टीका व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त निवड समिती लक्ष्य ठरत होती, पण त्यानंतर शास्त्री आणि कोहली यांच्यावरही टीका व्हायला लागली. त्यानंतर कोहली म्हणाला की, " संघ निवडण्याचे काम निवड समिती करते, त्यामध्ये माझा हस्तक्षेप नसतो. " कोहलीचे हे बोलणे अनाकलनीय आहे. कारण निवड समितीबरोबर कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक हे संघ निवडीचा एक भाग असतात. या बैठकीमध्ये जी चर्चा होते आणि निर्णय होतात त्यांना हे सारे जबाबदार असतात. करुणला वगळण्याचा निर्णय माझा नव्हता, असे जेव्हा कोहली बोलतो तेव्हा त्याला वगळण्याचे कारण तो का सांगत नाही? हा मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत बरेच प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले आहेत आणि त्यामुळेच कोहली आणि शास्त्री यांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे या दोघांना जर आपली प्रतिमा सुधारायची असेल तर त्यांनी पहिल्यांदा आपली हुकूमशाही बंद करण्याची गरज आहे. पण जर हे असेच सुरू राहिले तर संघातील गुणवान खेळाडू, संघ आणि चाहते यांना जोरदार फटका बसल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: Shastri and Kohli are dictatorships on Indian cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.