नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पहिल्या तीन महिन्यांसाठी बीसीसीआयने १ कोटी २० लाख रुपयांहून काहीसं अधिक मानधन दिलं आहे. शास्त्री यांनी यावर्षी जुलैमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून पुनरागमन केलं होतं. त्यांना १८ जुलै ते १६ आॅक्टोबर या कालावधीसाठी १ कोटी २० लाख ८७ हजार १८७ रुपयांचे मानधन देण्यात आलं असून बीसीसीआयने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे. तसंच, भारताबाहेर झालेल्या स्पर्धांचे एकूण मानधन स्वरुपात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ५७ लाख ८८ हजार ३७३ रुपयांचे मानधनही देण्यात आलं आहे. बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे.
शास्त्रींना बीसीसीआय देऊ शकते 7 कोटींची गुरुदक्षिणा
भारतीय संघाचे प्रशिक्षक या नात्यानं रवी शास्त्री यांना वर्षाकाठी 7 कोटींहून अधिकचं पॅकेज मिळण्याची शक्यता होती. बीसीसीआयनं रवी शास्त्रींना अशा प्रकारची ऑफर दिल्याचं सुत्रांकडून समजलं होतं. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदासाठी इतक्याच मानधनाची मागणी केली होती. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं शास्त्रींना वर्षाला 7 कोटींचं पॅकेज देण्याचं ठरवल्याची माहिती होती. शास्त्रींना जास्तीत जास्त साडेसात कोटींपर्यंत मानधन देण्यात येईल, त्यापेक्षा अधिक नसेल, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं सांगितलं होतं.
तिसऱ्यांचा टीम इंडियासोबतशास्त्री हे तिसऱ्यांदा टीम इंडियासोबत अधिकारी म्हणून जुळत आहेत. याआधी 2007 मध्ये ते बांगलादेश दौऱ्याच्या वेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. त्यानंतर ऑगस्ट 2014 ते जून 2016 या कालावधीसाठी संघाचे संचालक राहिले. याच काळात भारताने श्रीलंकेला त्यांच्याच देशात पराभूत करीत मालिका जिंकली होती. 2015चा विश्वचषक आणि 2016च्या टी-20 विश्वचषकातदेखील संघाने उपांत्य फेरी गाठली होती.