- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना ओव्हल मैदानावर ७ सप्टेंबरपासून खेळविण्यात येईल. याआधीच मालिका १-३ अशी गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष द्यावे लागेल. काही दिवसांपूर्वीच माझी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी, खूप निराश असल्याचे म्हटले. खास करुन कर्णधार विराट कोहली अत्यंत निराश असल्याचेही म्हटले. कारण, ही मालिका एकतर्फी नक्कीच झाली नाही. सध्या मालिकेचा निकाल इंग्लंडच्या बाजूने ३-१ असा असला, तरी हाच निकाल भारताच्या बाजूनेही लागला असता. जर पहिला आणि चौथा सामना भारताने जिंकला असता तर... एकूणच दोन्ही संघांना समान संधी मिळाल्या. भारताने विजयाच्या संधी गमावल्या आणि याच गोष्टीवर शास्त्री यांनी आपली निराशा व्यक्त केली.
यंदा भारतीय संघाकडून अशीच कामगिरी पाहण्यास मिळाली. कारण याआधी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला. पण तिन्ही सामने जिंकण्याची भारताला संधीही होती. आता मालिका गमावल्यानंतर ही पिछाडी २-३ अशी करण्यात भारताला यश आले, तर ते संघासाठी नक्कीच चांगली बाब ठरेल. मात्र, यासाठी संघात काही बदलही होण्याची शक्यता आहे. माझ्यामते संघात दोन बदल होतील आणि कदाचित ते झालेही पाहिजेत. एक बदल म्हणेजे युवा पृथ्वी शॉची निवड. भारताचे दोन्ही सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल हे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे दोघांपैकी एकाची जागा पृथ्वीला मिळायला पाहिजे. त्याच्या कमी वयाकडे न पाहता गुणवत्ता पाहून त्याला नक्कीच खेळण्याची संधी देण्यात यावी असे मला वाटते. पृथ्वी कोणाची जागा घेईल हेही पहावे लागेल. धवन - राहुल यांच्यापैकी धवनने जास्त धावा केल्या आहेत, पण तरीही तो अँडरसन - ब्रॉडच्या माºयापुढे आत्मविश्वासाने खेळताना दिसला नाही. दुसरीकडे राहुलची कामगिरी मला २०१४च्या विराट कोहलीची आठवण करुन देते. एकूणच युवा खेळाडू म्हणून लक्षात घेता राहुल आणि पृथ्वी अशी जोडी खेळविण्याची शक्यता मला वाटते.
दुसरा बदल म्हणजे अष्टपैलू हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता आहे. तो आॅफस्पिन मारा करत असल्याने रविचंद्रन अश्विनसाठी पर्याय भारताला मिळू शकतो. त्याचबरोबर झाला तर तिसरा बदलही होऊ शकतो, तो म्हणजे हार्दिक पांड्याच्या जागेवर रविंद्र जडेजाची निवड. वेगवान गोलंदाजांमध्ये इशांत शर्म, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह आपली जागा निश्चित पक्के ठेवतील. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सामन्यात वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघाला विजयाच्या संधी निर्माण करुन दिल्या आहेत. मुख्य अडचण आहे ती फलंदाजांची. त्यांच्या अपयशाचा भारताला फटका बसत आहे. भारतीय संघ विजयाच्या संधी निर्माण करत आहे, पण जिंकत नाही. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्याचे मुख्य आव्हान कर्णधार कोहली व प्रशिक्षक शास्त्री यांच्यापुढे आहे.
Web Title: Shastri, Kohli get disappointed with England series win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.