मुंबई - माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणा-या टीकाकारांना प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जोरदार चपराक लगावली आहे. धोनी त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या खेळाडूंपेक्षा फिट आणि फास्टर आहे. सध्याच्या घडीला संघातील धोनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. धोनीच्या खेळातील चूका शोधण्यापेक्षा टीकाकारांनी वयाच्या 36 व्या वर्षी त्यांची कामगिरी कशी होती याचा विचार करावा असे शास्त्री यांनी सुनावले आहे.
अलीकडे प्रसारमाध्यमांमध्ये धोनीच्या कामगिरीचे कठोर मुल्यमापन सुरु असते. एखाद्या डावात धोनीचे अपयश किंवा त्याला सामना जिंकून देता आला नाही तर तो मोठा मुद्दा बनवला जातो. नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत धोनीने चांगले प्रदर्शन करुन टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.
आम्ही मुर्ख नाही आहोत. गेल्या 30-40 वर्षांपासून मी क्रिकेट पाहतोय. विराट दशकभरापासून भारतीय संघामध्ये आहे. धोनी 36 वर्षांचा आहे पण तो 26 वर्षांच्या खेळाडूवर मात करु शकतो असे शास्त्री म्हणाले. यष्टीरक्षक म्हणूनही धोनी तितकाच चपळ आहे. यष्टीरक्षक म्हणूनही धोनीच्या कामगिरीला तोड नाही. अलीकडेच मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या जवळपास जाईल असा कुठलाही युवा खेळाडू दिसत नसल्याचे म्हटले होते.
धोनीच्या नेृत्वाखाली भारताने दोन वर्ल्डकप जिंकले आहेत. धोनीवर टीका करणा-यांनी स्वत:ला आरशासमोर ठेऊन प्रश्न विचारावा, वयाच्या 36 व्या वर्षी आपण कुठे होतो ? वेगाने पळता यायचे का ? धोनी या वयात दोन धावा पूर्ण करुन तिसरी धाव घेण्यासाठी तत्पर असतो. आजच्या तारखेला एकदिवसीय संघात धोनीची जागा घेईल असा दुसरा कुठलाही यष्टीरक्षक तुमच्याकडे नाहीय असे शास्त्री यांनी सांगितले.
काय म्हणाले शास्त्री विराट कोहलीबद्दल विराट कोहली एक फलंदाज आणि व्यक्ती म्हणून ज्याप्रकारे प्रगती करत आहे त्याचा संघावर सकारात्मक परिणाम होत असल्याचं ते म्हणाले आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रवी शास्त्री यांनी आपली आणि विराट कोहलीची तुलना होणं आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरण्याची आमची भूमिका सारखीच असल्याने एकमेकांसोबत काम करताना आम्हाला समस्या जाणवत नाहीत.
'आमचं समीकरण चांगलं जुळतं. आमच्या दोघांचंही व्यक्तिमत्व सारखं आहे. आमच्या नात्यात विश्वास हा मुख्य घटक आहे. आम्ही दोघेही कणखर आहोत, आणि कोणताही सामना जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरतो. आम्ही जिंकण्यासाठी खेळतो. आम्ही टाईमपास करण्यासाठी जात नाही', असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.