सिडनी : भारताची आक्रमक सलामी जोडी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्यापुढे पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणे अत्यंत धोकादायक असल्याची कबुली आॅस्ट्रेलियाची गोलंदाज मेगान स्कट हिने दिली आहे. शेफाली आणि स्मृतीने स्कटचा मारा अक्षरश: फोडून काढला होता. ‘रविवारी अंतिम सामन्यात या दोघींपासून सावध राहावे लागेल,’ असे मत स्कटने व्यक्त केले.
द. आफ्रिकेविरुद्ध गुरुवारी पावसाच्या व्यत्ययात आॅस्ट्रेलियाने दुसरा उपांत्य सामना ५ धावांनी जिंकला. स्कटने या सामन्यात १७ धावात २ गडी बाद केले होते. शेफालीचे आक्रमक फटके मात्र स्कटच्या डोळ्यापुढे वारंवार येत आहेत. शेफालीने स्कटला पहिल्या षटकात चार चौकार मारले होते. त्यामुळेच स्कट ही भारताच्या सलामी जोडीविरुद्ध चिंताग्रस्त आहे.
आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला तिने सांगितले की, ‘मला भारतीय संघाविरुद्ध खेळणे पसंत नाही. भारतीय फलंदाज माझ्या गोलंदाजीवर तुटून पडतात. शेफाली आणि स्मृती यांनी माझा मारा सहज खेळला होता. शेफालीने तिरंगी मालिकेत जो षटकार मारला होता, तो माझ्या चेंडूवर मारलेला सर्वाधिक गगनचुंबी षटकार असावा. आमच्याकडे डावपेच असले तरीही मी त्यांच्या फटक्यांवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरली आहे.’ (वृत्तसंस्था)
>मिशेल स्टार्क पत्नीचा खेळ पाहण्यास उत्सुक
आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क द. आफ्रिकेविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार नाही. रविवारी भारताविरुद्ध होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो पत्नी एलिसा हिली हिला प्रोत्साहन देण्यास मैदानात उपस्थित राहणार आहे.
चार वेळेचा विजेता आॅस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध जेतेपदाचा बचाव करण्यासाठी एमसीजीवर खेळणार आहे. एलिसा या संघाची यष्टिरक्षक-फलंदाज आहे. आॅस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचे प्रशिक्षक जस्टिन लेंगर यांनी, ‘आयुष्यात फार कमी क्षण कुटुंबासाठी येतात. पत्नीचा उत्साह वाढविण्याासाठी उपस्थिती दर्शविणे ही स्टार्कसाठी अभिमानास्पद बाब आहे,’ असे म्हटले.
किम कॉटन- एहसान रझा अंतिम सामन्यात पंच
भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे किम कॉटन आणि पाकिस्तानचे एहसान रझा हे मैदानी पंच राहतील. वेस्ट इंडिजचे ग्रेगरी ब्रेटवेथ हे टिव्ही पंच, झिम्बाब्वेचे लँगटन रूसरे चौथे पंच आणि इंग्लंडचे ख्रिस ब्रॉड हे सामनाधिकारी राहतील.
Web Title: Shefali, memory is in danger of 'powerplay'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.